गोंडेगाव कोळसा खाणीत दोघांचा दबून मृत्यू

0
12

नागपूर ,दि.24 : चोरी करण्यासाठी सहा ते सात जण बंद असलेल्या कोळसा खाणीत शिरले. मात्र, कोळशाचा मोठा दगड अंगावर कोसळल्याने दोघेही त्याखाली दबल्या गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडेगाव कोळसा खाणीत घडली असून, मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रितेश भीमराव चौरे (२५, रा. रमानगर, कामठी) व सतीश केशव देशमुख (३५, रा. बीबी कॉलनी, कामठी) अशी मृतांची नावे आहेत. वेकोलिची गोंडेगाव कोळसा खाण काही वर्षांपासून बंद असून, तिथे कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री काही चोरट्यांनी कोळसा चोरून नेण्यासाठी खाणीत प्रवेश केला. त्यांनी खाणीतील एफएस-४ या खुल्या भागात कोळसा खोदून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोळशाचा मोठा दगड कोसळला.
रितेश व सतीश दगडाखाली दबल्या गेले. त्यामुळे त्यांच्या साथीदारांनी लगेच पळ काढला. येथील सुरक्षा रक्षकांना दोघेही दबले असल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.