वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भूसंपादन विधेयक मंजुरीच्या वेळी लोकसभेतील मतदानाच्या दांडी मारलेल्या दांडीबहाद्दर खासदारांना भारतीय जनता पक्षाच्या आज (मंगळवार) पार पडलेल्या साप्ताहिक बैठकीत उभे करण्यात आले. तसेच त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारण्यात आले.
“खासदारांना पक्षाने सादर केलेले विधेयक निरुपयोगी वाटत असेल, तर त्यांनी निवडणुकीची तिकिटे घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडणूक का जिंकली‘, अशा शब्दात संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी भूसंपादन विधेयक मंजुरीच्यावेळी लोकसभेत गैरहजर असलेल्या खासदारांना फटकारले आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने भूसंपादन विधेयक लोकसभेत मांडले. तसेच त्यासाठी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली. यावेळी गैरहजर असलेल्या खासदारांना पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत उभे करण्यात आले. त्यामध्ये वरूण गांधी, पूनम महाजन, प्रितम मुंडे, बाबूल सुप्रियो यांच्यासह एकूण 20 खासदारांचा समावेश होता. पक्षाच्या बैठकीत त्या सर्व खासदारांचे नाव घेऊन त्यांना उभे करण्यात आले. तसेच या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा मिनिटे आधी पोचले. ठरलेल्या वेळेनंतर बैठकीला पोचलेल्या खासदारांना यावेळी खडसावण्यात आले.