पुर्व विदर्भासह मध्यप्रदेशात पावसासह गारपीट

0
15

गोंदिया,दि.25ः- :गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट कमी होऊन वातावरणात उष्णता जाणवू लागली होती. गुरुवारी (दि. 24) अचानक वातावरणात बदल झाला आणि अवकाळी पावसाबरोबर जोरदार गारपीट पुर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तसेच शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट,छिंदवाडा व सिवनी जिल्ह्यात झाली. दहा ते पंधरा मिनिटे किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर गारांचा सडा पडायला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास गारपीट सुरू होती. ठिकठिकाणी गारांचा खच साचला होता.गोंदिया जिल्ह्यात रात्रीला पावसाने हजेरी लावली.आज दिवसभरापासून वातावरण ढगाळ असून पाऊस अध्येमध्ये हजेरी लावत आहे.पावसाचा फटका भाजयुमोच्या कवीसमेलनाला बसला असून आयोजकांना स्थान बदलावे लागले आहे.शेजारील भंडारा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या पावसासोबतच गारा पडल्या असून खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोदामेंढी येथे चण्याएवढ्या, सिरसोली, राजोली, इंदोरा, खात आदी काही भागांत बोराएवढ्या गारांचा सडा पडला. रस्त्यावर, अंगणात आणि शेतामध्ये गारांचा खच साचलेला होता. गारांचा सडा पडल्याने शेतात असलेले काही मजूर गारपिटीने जखमी झाले. या गारपिटीने मिरची, गहू, कापूस याबरोबरच पालेभाज्या आदी शेतमालाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.त्याबरोबर खात परिसरातील देवमुंढरी, सिवनी येथेही जोरदार पावसासह गारपीट झाली. तांडा, देवमुंढरी परिसरामध्ये रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गारांचा थर साचला होता.रामटेक व मौदा तालुक्यातील नगरधन,तांडा,देवमुंढरी आदी गावामध्ये गारांचा पाऊस पडला असून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.