शरद पवार लढविणार राष्ट्रपतिपदाची निवडणूक

0
8

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि केंद्रातही भाजपा व राष्ट्रवादी कॉंगे्रस यांच्यात जवळीक वाढत आहे. यामागचे कारणही तसेच असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत. राज्यात व केंद्रात भाजपाला वारंवार साथ देणा-या राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार २०१७ मध्ये होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील मैत्रीचे संबंध आता लपून राहिलेले नाहीत. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादीने मांडलेला अविश्वास ठराव भाजपाच्याच मदतीने मंजूर झाला होता. ही युती शिवसेनेला सत्तेतून बाजूला करण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणात भविष्यातील तडजोडीसाठी होती, हेदेखील आता स्पष्ट झाले आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. यात म्हटले आहे की, शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता फार जास्त आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.भाजपातीलच उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती बाहेर आली आहे. भाजपा आणि स्वत: नरेंद्र मोदी पवारांना या निवडणुकीत पाठिंबा देतील. सोबतच, रालोआतील घटक पक्ष असलेली शिवसेनाही पवार यांच्या उमेदवारीला मराठी माणूस या तत्त्वानुसार पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात १४ फेबु्रवारी रोजी बारामतीत भेट झाली होती. पवारांच्या निमंत्रणावरून स्वत: मोदी बारामतीत आले होते. या भेटीतच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे सूत्राच्या हवाल्याने वृत्तात नमूद आहे. या भेटीत मोदी यांनी एक गौप्यस्फोटही केला होता. देशाचा कारभार पाहताना पवार यांच्यासारख्या नेत्यांचा अनुभव नेहमीच उपयुक्त ठरत असतो, असे सांगत आपण पवारांशी महिन्यातून दोन ते तीन वेळा फोनवरून चर्चा करीत असतो, असेही मोदी म्हणाले होते.