मुंबई,दि.28 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथ घेणार अाहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.आज ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे शपथ घेणार आहेत.
या सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असेल, ते पद राष्ट्रवादीकडे असेल. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास अाघाडीच्या बुधवारी रात्री बैठकीनंतर दिली.
महाराष्ट्र विकास अाघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची मंगळवारी निवड करण्यात अाली हाेती. बुधवारी सकाळी ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्यासह राजभवनावर जाऊन राज्यपालांना शपथविधी साेहळ्याचे निमंत्रण दिले. ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिलेली अाहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हाेईल. काेणत्या पक्षास किती मंत्रिपदे याविषयी अाघाडीच्या बैठकीत सुमारे तीन तास खल झाला. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी १५ तर काँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळणार आहेत.
उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा; विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे : प्रफुल्ल पटेल
अजित पवार यांची सत्तेतून माघार; जयंत पाटील हाेणार उपमुख्यमंत्री…
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंड थंड झाल्यानंतर पुन्हा पक्षात परतलेल्या अजित पवारांनाच या पदावर नियुक्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही अामदारांनी शरद पवार यांच्याकडे केली हाेती. तेही अनुकूल हाेते, मात्र स्वत: अजितदादांनीच तूर्त मंत्रिपद घेण्यास नकार दिल्याची माहिती अाहे.
संभाव्य खातेवाटप
उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री जयंत पाटील – उपमुख्यमंत्री/अर्थ एकनाथ शिंदे – सार्वजनिक बांधकाम रवींद्र वायकर – नगरविकास सुभाष देसाई – उद्योग अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक उदय सामंत – गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड – वैद्यकीय शिक्षण नवाब मलिक – कामगार धनंजय मुंडे – कृषी बाळासाहेब थोरात – महसूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष
सोनिया, मोदी यांना निमंत्रण
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेने निमंत्रित केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता असून, अहमद पटेल व अन्य राष्ट्रीय नेते शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील. दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये बिगरभाजप काँग्रेस-जनता दल संयुक्त सरकारच्या शपथविधीसाठी सोनिया यांच्यासह मायावती आणि अन्य राष्ट्रीय नेते उपस्थित होते. याच धर्तीवर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या या समारंभाला राष्ट्रीय नेत्यांनी उपस्थित राहावे, असे शिवसेनेचे प्रयत्न आहेत.
मंत्रिमंडळात यांना स्थान मिळू शकते
शिवसेना : मुख्यमंत्र्यांसह११ कॅबिनेट व ५ राज्यमंत्री
कॅबिनेट मंत्री : एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, उदय सामंत,तानाजी सावंत, अनिल बाबर, शंकरराव गडाख, अनिल परब, सुनील प्रभू
राज्यमंत्री : शंभूराज देसाई, दादा भुसे,सुनील राऊत, प्रकाश आबिटकर, सुहास कांदे, आशिष जैस्वाल, ज्ञानराज चौगुले,संजय रायमुलकर, संजय शिरसाट
राष्ट्रवादी : ११ कॅबिनेट व ४ राज्यमंत्री
कॅबिनेट मंत्री : अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील,धनंजय मुंडे, नवाब मलिक, राजेश टोपे,अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, सतीश चव्हाण, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे
राज्यमंत्री : धर्मराव आत्राम,बबनदादा शिंदे, मकरंद पाटील, संग्राम गावंडे, दिलीप बनकर, संग्राम जगताप, यशवंत माने, भारत भालके, दत्ता भरणे
काँग्रेस : ९ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री
कॅबिनेट मंत्री : बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के.सी. पाडवी,नाना पटोले, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नितीन राऊत, अमिन पटेल
राज्यमंत्री : यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, सुनील केदार, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे,राजू आवळे, कुणाल पाटील, शिरीष चौधरी
मित्रपक्ष : एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री राजू शेट्टी, बच्चू कडू”,





