याकूबला फाशीच, सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळले

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. २१-मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी फेटाळून लावली आहे. यामुळे याकूब मेमनला फासावर लटकविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टाडा न्यायालयाने २००७ मध्ये याकुब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेस याकुबने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्याच्या फाशीची शिक्षेवर शिक्कामोर्तंब केले आहे. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाने हा निकाल दिला. याकुब मेमनचा चुलत भाऊ उस्मान मेमन याने सर्वोच्च न्यायालयात ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती.दरम्यान, ३० जुलै रोजी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये सकाळी ७ वाजता याकुबला फाशी दिली जाणार अशी चर्चा सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचा दया अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर याकूबने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली असून त्या याचिकेवर आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. याकूबला 30 जुलै रोजी फाशी दिली जाऊ शकते. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तशी तयारी सुरू असल्याची माहिती आहे. पुण्यावरुन जल्लादही बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
सोमवारी याकूबची पत्नी व मुलगी भेटण्यासाठी नागपुरात येणार असल्याची माहिती होती. परंतु, याकूबची पत्नी आणि मुलीऐवजी त्याचा चुलतभाऊ उस्मान मेमन हा सकाळी 11 वाजता नागपूर कारागृहात दाखल झाला. सामान्य कैद्यांसाठी असणाऱ्या मुलाखत कक्षाऐवजी त्यांची कारागृहाच्या दुसऱ्या कक्षात भेट ठेवण्यात आली. या वेळी त्यांनी जवळपास 30 मिनिटे चर्चा केली.
दरम्यान, याकूब मेमन हा साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार व फरार आरोपी टायगर मेमन याचा भाऊ आहे. याकूबने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसोबत मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. 27 जुले 2007 मध्ये टाडा कोर्टाने त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. याकूब मागील 20 वर्षांपासून तुरुंगातच आहे.

1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 निष्पाप लोकांचा मृत्यु झाला होता. तसेच 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.