आधी प्रशासकीय नोकरी,तरीही परीक्षा देऊन MPSCमध्ये राज्यात पहिला

0
15

गडचिरोलीच्या शुभमची यशोगाथा

गडचिरोली :-जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते. प्रयत्न आणि कष्ट केल्यास यश नक्कीच मिळते हे तुम्ही अनेकदा पाहिलेही असेल आणि अनुभवले देखील असेल.महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी गावातील एका मुलाने (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्न आणि कष्ट तर केलेच पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. मात्र, त्यातील मोजकेच विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण होतात. विशेष म्हणजे शासकीय नोकरी करत त्याने या यशाला गवसणी घातली आहे.

शुभम येलेश्वर कोमरेवार (वय २६) असे त्या मुलाचे नाव असून जानेवारी २०२३ मध्ये साहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदासाठी शुभमने परीक्षा दिली होती. त्यात तो पात्र ठरला. त्यानंतर, तो १ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीला समोर गेला. परीक्षेत २०० पैकी ११६ गुण आणि मुलाखतीमध्ये ५० पैकी ३५ असे एकूण १५१ गुण मिळवून तो राज्यात प्रथम आला.शुभमचे वडील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तर आई पदवीधर शिक्षिका आहे. वडील धानोरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना शुभमचे प्राथमिक शिक्षण त्याच तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ईरूपटोला येथे झाले. त्यानंतर ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोली येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने शिवाजी कनिष्ठ विज्ञान विद्यालयात पूर्ण केले. घरची परिस्थिती चांगली असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने नागपूर गाठले. मत्स्य व पशुधन विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी मत्स्य विज्ञान शाखेत डिस्टिंक्शन प्राप्त करत पदवी मिळविली. त्यानंतर मास्टर करण्यासाठी भारतातून ३३वा क्रमांक पटकावून तो सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) मुंबई येथे दाखल झाला.

शिक्षण सुरू असतानाच २०१९ ला सरळसेवा भरतीतून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर नियुक्ती झाली. सध्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदावर प्रादेशिक मत्स्य व्यवसाय कार्यालय, पुणे येथे शुभम कोमरेवार कार्यरत आहे. सप्टेंबर २०१९ त्याची या पदावर नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे त्याची पहिली नियुक्ती ही गडचिरोली आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात झाली. त्याने गडचिरोली येथे ३ वर्ष ७ महिने सेवा दिली. दरम्यान, त्यांनी साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळलेला आहे. या दरम्यान त्यांनी साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पदासाठी परिश्रम घेतलं. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

शुभमचे वडील हे मूळचे अहेरीचे. मात्र, विविध तालुक्यात शासकीय सेवा देत ते गडचिरोली जिल्हा मुख्यालयात स्थायिक झाले. शुभमला एक भाऊ असून तो व्यवसाय करतो. नुकतेच १५ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून शुभमच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात शिक्षण घेऊन तसेच याच जिल्ह्यात शासकीय सेवा देऊन साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पदाकरीता दिलेल्या परीक्षेत राज्यातून प्रथम येणे ही अभिमानास्पद बाब आहे.भविष्यात देशाला प्रथीनयुक्त अन्नसुरक्षा शास्वत ठेवण्यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे अमुलाग्र योगदान राहणार आहे. या संधीद्वारे मी राज्यतील मत्स्य व्यावसायकांना आणि पारंपरिक मासेमारांना प्रोत्साहन देऊन मत्स्य उत्पादनात वाढ करण्यास प्रयत्नशील राहणार आहे.