* माओवाद्यांनी पूरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य केले हस्तगत.
गडचिरोली,दि.24-विलय सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला दिनांक 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. याच विलय सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला.
काल दिनांक 23/09/2023 रोजीचे 11:45 वा. चे दरम्यान उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात पोस्टे पुराडा पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना कोरची व टिपागड दलमच्या माओवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे पुराडा पोलीस पथकासोबत असलेले डिएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असतांना, एक संशयित जागा मिळून आल्याने त्याबाबतची माहिती मा. अपर पोलीस अधिक्षक (अभियान) गडचिरोली यांना दिली. तसेच मा. वरिष्ठांच्या आदेशाने गडचिरोली येथुन बीडीडीएस पथक घटनेच्या ठिकाणी बोलावून घेतले व त्यांचे सहाय्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिढ ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढया मळकट रंगाचे पाऊच 4 नग मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये 11.8 किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक (अहेरी)यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा साहिल झरकर यांच्या नेतृत्वात पोस्टे पुराडाचे प्रभारी अधिकारी सपोनि. भूषण पवार व जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.