अर्जुनी-मोरगाव- गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे एक दिवाळी आदिवासी बांधवांसोबत हा उपक्रम राबविण्यात येत असुन या सामाजिक उपक्रमांअंतर्गत अर्जुनी/मोर तालुक्यातील पोलिस स्टेशन केशोरी अंतर्गत आदिवासी भागातील उमरपायली येथे आदिवासी बांधवांना दिवाळीची भेट म्हणून पोलिस दलातर्फे साड्या, ब्लॉंकेट, दिवाळी फराळ व मुलांना शालेय वह्या, पेन, पेन्सील, अशा विविध प्रकारच्या वस्तू वाटप करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सण सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ति आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो या बाबीकडे लक्ष्य देत आदिवासी नागरिक व त्यांच्या मुला मुलींना दिवाळी सण साजरा करण्यासाठी मदत मिळावी, या करिता गोंदिया जिल्ह्यातील अतीदुर्गम व नक्षलग्रस्त भागात गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे एक दिवाळी आदिवासी बांधवांसोबत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधिक्षक (देवरी कँप) अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी/मोर तालुक्यातील पोलीस स्टेशन केशोरी कार्यक्षेत्रातील आदिवासी भागातील उमरपायली येथे आदिवासी बांधवांना पोलीस स्टेशन केशोरीतर्फे दिवाळीची भेट म्हणून गावातील बंधु -भगिनींना साड्या, ब्लॉंकेट, दिवाळी फराळ व मुला-मुलींना शालेय वह्या, पेन, पेन्सील, कंपास, डबा, बॉटल अशा वस्तुंचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात केशोरीचे प्रभारी ठाणेदार मुंडे, सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगावचे प्रभारी अधिकारी उघडे, गोलवाल, पोलिस स्टेशन केशोरी व सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगावचे अधिकारी, कर्मचारी, गावातील सरपंच, पोलिस पाटील व प्रतिष्ठीत नागरिकांनी सहकार्य केले.