नॅशनल डिझास्टर रिस्पाँस फोर्स कार्यशाळेतून दिली आपत्ती व्यवस्थापनाची माहिती

0
24

गोंदिया,दि.3 : वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीच्या काळात नागरिकांनी कोणत्या प्रकारची खबरदारी घेऊन आपत्ती व्यवस्थापन कशाप्रकारे करावे याबाबतची माहिती (ता.२) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नॅशनल डिझास्टर रिस्पाँस फोर्सच्या तळेगाव (पुणे) येथील अधिकाऱ्यांनी आयोजित कार्यशाळेत दिली. कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हधिकारी नरेंद्र लोणकर व पोलीस अधिकारी व एन.डी.आर.एफ.चे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोणतीही आपत्ती ही सांगून येत नसल्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सक्षम असले पाहिजे. आपत्तीच्या काळात कोणत्या पद्धतीने मदत व बचाव करावा याबाबतची माहिती यावेळी दिली. देशात आलेल्या आपत्तीच्या काळात तसेच जपानमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी आणि नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाच्या काळात एन.डी.आर.एफ.च्या चमूने कशाप्रकारे मदत केली याबाबतची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
भूकंप, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, क्लोरिन वायुगळती, ज्वालामुखीचा उद्रेक या आपत्तीच्या काळात मदत व बचाव करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजावावी लागत असल्याचे श्री. दत्त यांनी यावेळी सांगितले.
पूर परिस्थितीच्या काळात पूर येण्यापूर्वी, पूर आल्यावर आणि पूर ओसरल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती देवून पूर परिस्थितीच्या काळात प्रत्येकाने दक्ष राहावे असेही श्री.दत्त यांनी ‍सांगितले.
आपत्तीच्या काळात कशाप्रकारे मदत व बचाव कार्य करण्यात येते याबाबतची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आले. ज्या व्यक्तीला पाण्यात पोहता येत नाही त्या व्यक्तीना पुरातून सुखरुपपणे बचाव करण्यासाठी प्लॅस्टीकच्या बॉटल, प्लॅस्टीकच्या मडक्यांच्या वापर, लाईफ जॅकेट, लाईफ रिंगचा वापर करुन स्वत:चा बचाव कसा करता येईल तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला पाण्यातून कसे वाचवावे व आपत्तीच्या काळात प्रथमोपचार कशाप्रकारे करावे याबाबतची माहिती सुनिल कुमार यांनी दिली.
प्रशिक्षण कार्यशाळेला जिल्हा बचाव पथक, तालुका बचाव पथकातील सदस्य, व्हाईट आर्मीचे सदस्य, पोलीस, गृहरक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.