बॅरिस्टर वानखेडे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते

0
17

नागपूर दि. २५:: अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १० वर्षे सादर करणाऱ्या बॅरिस्टर वानखेडे यांनी प्रत्येक अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला विकासाकडे नेले. काही व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. नागपूरचे सुपुत्र असणाऱ्या वानखेडे यांनी मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधले. त्याच स्टेडियममध्ये माझ्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी मला अनुभवता आला. राजकारण, समाजकारण, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात प्राविण्य प्राप्त असणारे बॅरिस्टर वानखेडे खऱ्या अर्थाने अष्टपैलू होते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले.

बॅरि. शेषराव वानखेडे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तर प्रमुख अतिथी म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ खेळाडू चंदू बोर्डे, कुंदाताई विजयकर, रमोला महाजनी, आ. सुनील केदार उपस्थित होते.

याप्रसंगी चंदू बोर्डे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी बॅ. वानखेडे यांनी केलल्या कार्याला उजाळा दिला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, बॅ. वानखेडे म्हणजे रॉयल माणूस होते. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे ‘फुटबॉल प्लेअर आॅफ द इअर’ हा पुरस्कार त्यांच्या नावाने सुरू करण्याची घोषणा यावेळी पटेल यांनी केली.

याप्रसंगी किशन शर्मा, बीसीसीआयचे जनरल मॅनेजर रत्नाकर शेट्टी, जयंत घाटे यांनीही वानखेडे यांच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक कुंदाताई विजयकर, संचालन रेणुका देशकर, आभार रमोला महाजनी यांनी मानले. कार्यक्रमात अतिथींच्या हस्ते ‘शेष स्मृती’ या सुधीर पाठक संपादित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.