वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आरोग्य सेवा विस्कळीत

0
18

केशोरी दि. २८ : सार्वजनिक आरोग्याची सर्वांगिन हमी घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून येथील एक पद रिक्त आहे. कार्यरत वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले तर त्याचा सरळ फटका येथील रुग्ण सेवेवर होत असतो. सध्या पोळ्यापासून येथील वैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्यामुळे तीच स्थिती निर्माण झाली आहे.

येथील प्राथमिक केंद्राचा कार्यभार इळदा येथील फिरत्या पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांचेवर सोपविण्यात आला आहे. येथील रुग्णांची गर्दी लक्षात घेता त्यांना फिरत्या पथकाकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली आहे. परिणामी त्यांना अधिक कामाचा ताण सोसावा लागत आहे.

केशोरी येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीचा प्रस्ताव अधांतरी असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करू पाहात आहे.

याकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने जातीने लक्ष देऊन त्वरित येथील रिक्त असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद भरावे, अन्यथा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे चेतन दहीकर, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज गर्दी असते. २०० च्यावर रुग्णांवर औषधोपचार करावा लागत असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त ठेवणे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचे दिसून येते.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील ३३ गावातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. त्यामुळे येथील सर्व मंजूर पदे भरणे आवश्यक आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन शवविच्छेदनगृह बांधण्यात आले आहे. परंतु त्या शवविच्छेदन गृहाचे आरोग्य केंद्राला हस्तांतरण करण्यात न आल्यामुळे तेही शवविच्छेदनगृह कार्यान्वित झालेले नाही.

शवविच्छेदनगृह कार्यान्वित करावे आणि ग्रामीण रुग्णालय मंजुरीचे अधांतरी असलेले प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंज़ुरी प्राप्त करून घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.