नागपुरात ‘एम्स’ उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

0
6

नवी दिल्ली दि.७: नागपूर शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍सेसे-एम्स) उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत’(पीएमएसएसवाय) महाराष्ट्रातील नागपूर, आंध्रप्रदेशातील मंगलागिरी तर पश्चिम बंगालमधील कल्याणी शहरात एम्स उभारणीस मंजुरी देण्यात आली. या तिन्ही शहरात एम्स उभारणीसाठी एकूण ४ हजार ९४९ कोटी रूपयांस मंजुरी देण्यात आली आहे. पैकी मंगलागिरीसाठी १ हजार ६१८ कोटी आणि कल्याणीसाठी १ हजार ७५४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले.

नागपूर येथील राज्यातील पहिल्यावहिल्या एम्सच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय आणि नर्सिंगसेवेचे गुणात्मक शिक्षण व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. एम्सअंतर्गत ९६० खाटांनी सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार आहे. यासह वैद्यकीय शिक्षण कक्ष, प्रशासकीय कक्ष, आयुष कक्ष, सभागृह, नर्सिंग महाविद्यालय, रात्री निवारा, वसतीगृह आणि निवासाच्या सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.