बुद्धांचा अस्थिकलश शुक्रवारी गोंदियात

0
14

गोंदिया दि.१४:: श्रीलंकेच्या पूर्व प्रांतात निलागिरी सेया नावाच्या भव्य स्तुपाच्या उत्खननातून एका सोन्याच्या पेटीसह तथागत बुद्धांचे दोन अस्थिधातू सुवर्ण कमळात आढळल्या. पुरातत्व खाते श्रीलंका व इतिहास संशोधकांच्या मतानुसार या अस्थिधातू तथागत बुद्धांच्या असून सम्राट अशोकाने धम्मप्रसारादरम्यान श्रीलंकेत पाठविले होते. या अस्थिधातू भारतीय बौद्ध महासभेच्या प्रयत्नाने विदर्भात दर्शनार्थ उपलब्ध होत आहेत. तसेच या अस्थिधातूंचे दर्शन घेण्याचे सौभाग्य शुक्रवार (दि.१६) रोजी गोंदिया जिल्हावासीयांना लाभणार आहे.
शुक्रवारी (दि.१६) सकाळी ५ वाजता अस्थिधातू कलश साकोलीवरून गोंदियाकडे प्रस्थान, सकाळी ६ वाजता सौंदड येथे, सकाळी ७ वाजता सडक-अर्जुनी येथे, सकाळी ८ वाजता गोरेगाव येथे, ९ वाजता पवित्र अस्थिधातूंचे स्वागत सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या फुलचूर येथील कार्यालयाजवळ, ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शन व्यवस्था बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया येथे, दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अस्थिंचे स्वागत आणि सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मैत्रेय बुद्धविहार भीमनगर (गोंदिया) येथे अस्थिधातू कलशाची दर्शन व्यवस्था होणार आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महापरित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर शनिवार (दि.१७) हे अस्थिकलश बालाघाट (मध्य प्रदेश) येथे नेण्यात येणार आहे. या वेळी मार्ग भीमनगर-सिंगलटोली-सूर्याटोला-रामनगर-राजलक्ष्मी चौक-पाल चौक-कुडवा नाका व बालाघाट रोडवर सकाळी ८ वाजता समारोप होणार आहे.
या वेळी श्रीलंका व विदेशातून आलेले सर्व भदंत व त्यांचा संघ उपस्थित राहणार आहे.तसेच दिल्लीचे भदंत चंद्रकीर्ती, भदंत संघधातू, नागपूरचे भदंत वननासामी, भदंत आनंद, भदंत लोकपाल, बालाघाटचे भदंत धम्मशिखर, केळझरचे आचार्य भदंत सोमानंद यांची मंगल उपस्थिती राहणार आहे.