मनरेगातून शेतीची कामे केव्हा होणार ?-राजेंद्र पटले

0
31

भंडारा दि.१४: देशात सत्ता नसताना मनरेगातून शेतीची कामे करण्यात येईल, असे आश्‍वासन देणारे आज सत्तेत असताना या घोषणा विसरले आहेत. त्यामुळे शेतीची कामे मनरेगातून करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे राजेंद्र पटले यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक धान आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात १.८0 लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात सर्व पिकांची लागवडीची एकूण टक्केवारी ९८ टक्के इतकी आहे. पावसाचा लहरीपणा, वाढते उष्णतामान आणि ऐन धान कापणीच्या पूर्वी लोंबीमध्ये असलेल्या धानावर किडीने हल्ला केला आहे.
धानाच्या बुंद्यावर असलेली किड हळूहळू पसरत लोंबीतील दाणा कुरतडत आहे. परिणामी याचा सरळ फटका उत्पादनावर होणार असल्याची शक्यता कृषी विभागातील अधिकार्‍यांनी वर्तविली आहे.
धान पिकावर दरवर्षी किड येत असली तरी यावर्षी या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. भंडारा जिल्ह्यात धानाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ६0 टक्के म्हणजे १ लाख हेक्टरमध्ये किडीने आक्रमण केले आहे.
परिणामी यावर्षी अधिक उत्पादनाची आशा धुसर झाली आहे. सरासरी होणार्‍या उत्पादनामध्ये १८ ते २0 टक्के उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतीची काम मनरेगातून करण्यात आली तर शेतकर्‍यांना अधिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही. तो निराश होणार नाही.
त्यामुळे केंद्र शासनाने शेतीची कामे मनरेगातून सुरू करावी, अशी मागणीही राजेंद्र पटले यांनी केली आहे.