सीबीआयने केली पीडीएमसीची चौकशी

0
9

अमरावती दि.१४: येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाची मंगळवारी सीबीआयच्या पथकाने चौकशी सुरु केली. अधिकारी व कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. चौकशीबाबत पूर्णत: गोपनीयता ठेवण्यात आली असून पीडीएमसीच्या सर्व विभागातील दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली.
काही वर्षांपासून पीडीएमसी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मध्यंतरी महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा वाद चिघळला होता. आता तो वाद उच्च न्यायालयात गेला आहे. त्यानंतर शरीररचनाशास्त्र विभागातील उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ झाल्याचे उघड झाले होते. त्यावरसुध्दा पीडीएमसी प्रशासनाची आरोग्य विद्यापीठाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या महाविद्यालयातील निवडणुकीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला होता. आता सीबीआयने पीडीएमसीची चौकशी सुरु केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी सकाळी ९ वाजता सीबीआयचे पोलीस निरीक्षक एच.एस. जांगिड, जी.एस. मिना, नीरज गुप्ता, दोन वैद्यकीय अधिकारी, दोन पंच व एक छायाचित्रकार पीडीएमसीत दाखल झाले. त्यांनी प्रत्येक विभागाची पाहणी करून चौकशी सुरु केली. शैक्षणिक विभाग व वैद्यकीय विभागातील सर्व वॉर्डांची पाहणी करून पथकाने दस्तऐवजांची तपासणी केली.