शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना दिल्या धानाच्या पेंढय़ा

0
9

तुमसर दि:१६-: चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत प्रभाग समिती बैठकीत अधिकार्‍यांना धानाच्या पेंढय़ा देऊन शेतकर्‍यांनी दुष्काळाची समस्या अवगत देण्याचा प्रयत्न केला.
चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणार्‍या गावातील नागरिकांच्या समस्या एकाचवेळी सोडविता याव्यात यासाठी शासनाने प्रभाग समिती गठित केली.जिल्हा परिषद सदस्य त्या समितीचे अध्यक्ष असून तालुक्यातील सर्व विभागप्रमुख त्या समितीचे सदस्य असतात.
दर तीन महिन्यात बैठक घेऊन एकाच वेळी नागरिकांचे समस्या निकाली काढा, असे निर्देश आहेत.
त्या बैठकीला पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, महावितरण, कृषी, पोलीस, पाणीपुरवठा, आरोग्य आदी विभागाचे प्रतिनिधींनी उपस्थित होते. यावेळी व्यथा मांडण्यासाठी चिखला जिल्हा परिषद क्षेत्रातील सीतासावंगी, चिखला, राजापूर, खंदाळ, गुढरी, मोकोटोला, भोंडकी, चिचोली, धुटेरा, घानोड आदी गावातून आलेल्या शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना धानाच्या पेंढय़ा देऊन दुष्काळाची समस्या अवगत करुन दिली.या परिसरात दुष्काळाची स्थिती ओढवली असताना जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्ह्यात कुठेही नाही तेवढी समस्या तुमसर तालुक्यात चिखला परिसरात असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. ही बाब महसूल विभागाच्या लक्षात असल्यामुळे या बैठकीत शेतकरी रोष काढतील या भीतीमुळे महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकार्‍यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे महसूल विभागाने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याची प्रतिक्रिया दिलीप सोनवाने, वामन गाढवे, श्रीराम गौपाले, साधू वघारे, नरेंद्र गौपाले, सुरेश काळसर्पे, बाबू हेडावू, रामदास बारागवणे या शेतकर्‍यांनी दिली.