शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री सुनील केदार

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वर्धा, दि 16 मे  :- शेतकऱ्यांवर ओढवलेली आपत्ती दुर्दैवी आहे.  महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. हे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जवाटप असो, कर्जमाफी असो, त्यांना बियाणे देणे असो की कापूस खरेदी असो सगळे उपक्रम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे केले आहे. यापुढेही हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे  राहून त्यांना अशा आर्थिक संकटातून बाहेर काढेल अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी शेतकऱ्यांना दिली.

पवनार येथील रवींद्र उर्फ विनायकराव निंबाळकर

या शेतकऱ्याचे 1 एकर केळी आणि 1 एकर पपईचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. आज शेतकऱ्यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन  पालकमंत्री सुनील केदार यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.तसेच संदीप हिवरे , शर्मिला अभय नगराळे तसेच इतर छप्पर उडालेल्या घरांची पाहणी केली. शासनाच्या नियमाप्रमाणे तातडीने मदत देण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना आजच रेशनकार्ड वितरित करून धान्याचे वाटप करण्याबाबत श्री केदार यांनी निर्देश दिलेत.

शासन – प्रशासनाने कोरोनामुळे लोकांचे मृत्यू होऊ नये यासाठी काही नियम केले आहे. त्या नियमांचा त्रास सामान्य माणसाला होऊ नये यासाठी जिल्ह्यात प्रशासन नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना घरपोच धान्य, भाजीपाला पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात निराधार आणि निवृत्ती वेतन मिळणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्यासारख्या उपाययोजना या कडक प्रतिबंधाच्या काळात प्रशासनाने राबविल्या आहेत. सामान्य नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी जे जे शक्य आहे ते शासन – प्रशासन म्हणून आमचे कर्तव्य आहे. वर्धेच्या नागरिकांनी आतापर्यंत यासाठी सहकार्यच केले आहे यापुढेही लोक सहकार्य करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, गट विकास अधिकारी ग्रामपंचायत सरपंच, तलाठी उपस्थित होते.