जिल्ह्यातील ११७ संस्था बंद

0
10

गोंदिया दि.२४: सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम १ जुलै ते ३0 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली. या सर्वेक्षणासाठी ज्या संस्था त्यांच्या पत्यावर नाहीत व केवळ कागदोपत्री त्या संस्था सुरू आहेत, अनेक वर्षे ज्या संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही अशा संस्थांचे अतिस्त्व संपविण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर अवसायनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेनुसार मार्च २0१५ अखेर एकूण १ हजार ९८ सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी एक संस्था सर्वेक्षणापूर्वी अवसायनात निघालेली आहे. उरलेल्या १ हजार ९७ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार व लेखापरीक्षण विभागातील ३२ कर्मचार्‍यांच्या विशेष पथकाने संस्था सर्वेक्षणाची कार्यवाही संस्थांना प्रत्यक्ष भेटी देवून पूर्ण करण्यात आली.
या सर्वेक्षणानुसार गोंदिया तालुक्यात २६0, तिरोडा १८२, गोरेगाव १५४, आमगाव १२७, सालेकसा ४९, देवरी व सडक अर्जुनी १४0, अर्जुनी मोरगाव १00, तसेच जिल्हास्तरावरील ४0 अशा एकूण १ हजार ९७ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी बंद असलेल्या संस्थांमध्ये गोंदिया ४१, तिरोडा ४२, गोरेगाव ६0, आमगाव ९, सालेकसा निरंक, देवरी/सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव १३, जिल्हास्तरावरील निरंक अशा एकूण ११७ संस्था बंद असल्याचे सर्वेक्षणाअंती निदर्शनास आले.
कार्य स्थगित करण्यात आलेल्या संस्थांमध्ये गोंदिया २, गोरेगाव ८, सालेकसा ३ अशा एकूण १३ संस्थांचा समावेश आहे. ज्या संस्थांचा ठावठिकाणा लागलेला नाही अशा गोंदिया तालुक्यातील २, गोरेगाव ८, आमगाव ३ अशा १३ संस्था आहेत.
बंद असलेल्या १४३ सहकारी संस्थांना सहकार अधिनियमातील तरतूदीनुसार अवसायनात घेण्याकरिता अंतिमपूर्वक नोटीस देण्यात आलेले आहे. सदर संस्थांना कलवकरच अवसायनात आणून या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी दिली.