दीक्षाभूमीचा विकास जागतिक दर्जानुसार करण्यात येईल – मुख्यमंत्री

0
5

नागपूर दि.२३: दीक्षाभूमीचा विकास जागतिक दर्जानुसार करण्यात येईल. यासाठी लागणारी जागा व निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दीक्षाभूमीवर आयोजित 59 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कर्नाटक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री एच.एच.अंज्जय्या, महापौर प्रवीण दटके, आमदार डॉ. मिलींद माने, नाना शामकुळे, प्रकाश गजभिये, समितीचे सचिव सदानंद फुलझेले, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, राजेंद्र गवई, विभागीय आयुक्त अनूप कुमार, नागपूर जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या भूमीचा सुपूत्र मुख्यमंत्री झाला. याचा मला आनंद होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील स्मारक मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर भव्य स्वरुपात होईल. लंडन मधील ज्या घरात त्यांचे शिक्षणासाठी वास्तव्य होते. ते घर शासनाने विकत घेतले आहे. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अर्थशास्त्र संशोधनाचा अभ्यासक्रम सुरु करु, जेणे करुन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी येथे भारतातील विद्यार्थी शिक्षण घेतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिले. त्या संविधानात भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नमूद करुन ठेवले आहे. गरीबातल्या गरीब माणसाला संविधानाने सन्मान दिला आहे. बाबासाहेबांनी ज्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो धर्म सर्व विश्वावर राज्य करीत आहे. आज चीन, जापान या सारखे प्रगत राष्ट्र गौतम बुद्धाच्या पंचशीलाच्या स्वीकार करुन प्रगती करीत आहे.

नितिन गडकरी म्हणाले, मानवतेच्या आधारावर समाजरचना असावी, असे विचार भगवान गौतम बुद्धांनी मांडले. त्या विचारावर श्रद्धा ठेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली. त्यामुळे ही भूमी पूनीत झाली. भगवान गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कपिल वस्तू (नेपाल) या ठिकाणी आहे. बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचे आठशे किलोमीटरचा रस्ता बुद्ध सर्किट म्हणून विकसित करण्यात येईल. यासाठी 4 हजार कोटी खर्च येणार असून येत्या दोन महिन्यात या कामाचे भूमिपूजन होईल.

कर्नाटक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री एच.अंज्जय्या यांनी कर्नाटक राज्याच्यावतीने दीक्षाभूमीच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली. मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर प्रवीण दटके, माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनीही विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी तर आभार स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी केले. समारंभास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, न्यायमूर्ती भूषण गवई आदी उपस्थित होते.