चार हजारांची लाच घेताना तलाठी जेरबंद

0
11

अमरावती :दि.१७: सातबारावर विहिरीची नोंद घेण्यासाठी ४ हजार रूपयांची लाच एका खासगी इसमाव्दारे स्वीकारणार्‍या तलाठयास सोमवरी जेरबंद करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिवरखेड येथील जनरल स्टोअर्स परिसरात  सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये तलाठी प्रदीप शामराव अजमिरे (४८) गुजरी बाजार, मोर्शी आणि त्याचा खाजगी सहकारी संजय रामभाऊ चेर (४५) रा. उमरखेड या दोघांचा समावेश आहे. मोर्शी तालुक्यातील मोळवन येथे संबंधित तक्रार कर्त्याची शेत असून त्या शेतात दोन विहीरी आहेत. या दोन्ही विहिरीची नोंद सातबारावर करावी असा अर्ज या तक्रारकर्त्याने तलाठी अजमिरे यांच्याकडे दिला त्यानंतर ११ नोव्हेंबरला संजय चेर याने या तक्रार कर्त्याला फोनवरून संपर्क साधून तलाठी अजमिरे हा ५ हजार रूपये मागत असल्याचे सांगितले त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी यामधील १ हजार रूपये संजय चेर याने घेतले. त्यानंतर उर्वरित चार हजार रूपये रक्कमेची मागणी केली. दरम्यान या तक्रारकर्त्याने तलाठी यांच्या लाचखोरीची माहीती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यावरून सोमवारी तलाठयाने चार हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दुसरा आरोपी संजय चेर याने चार हजार रूपयांची लाच स्विकारली तेथेच त्याला जेरबंद करण्यात आले. तर तलाठी अजमिरे याला मोर्शी येथील घरातून अटक करण्यात आली आहे