इमारतीचे बांधकाम निकृष्ट : ग्रामपंचायतची तक्रार

0
21

पवनी ,दि.१0: तालुक्यातील जिल्ह्याच्या सिमेवरील सावरला गावात परिसरातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. ग्रामस्थांचे पुढाकाराने इमारत बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. शासनाने आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी निधीची तरतूद करून देवून इमातरीचे बांधकाम सुरू केले. परंतु काम करणार्‍या यंत्रणेच्या दोषामुळे इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले व उर्वरित काम देखील तसेच होत आहे, अशी तक्रार ग्रामपंचायत सावरलातर्फे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांचेकडे करण्यात आलेली आहे.
अड्याळ विधानसभेचे तत्कालीन आमदार बंडूभाऊ सावरबांधे यांचे प्रयत्नामुळे सावरला सारख्या दुर्गम भागास शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी प्रदान केली. ग्रामस्थांनी पुढाकार घेवून आरोग्य केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतच्या मालकीची इमारत दिली व नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. गेल्या पावसाळ्यात पूर्णझालेल्या इमारतीचे स्लॅप गळल्याची तक्रार करण्यात आली परंतू यंत्रणेने तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतने मासिक सभेच्या ठरावानिशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषद अध्यक्ष यांचेकडे निकृष्ठ बांधकामाची तक्रार केलेली आहे.