दारूविक्री विरोधात अभिनव मोहिम ; ध्वनिक्षेपणाद्वारे जनजागृती

0
10

बोंडगावदेवी(अर्जुनी मोरगाव) दि.२५:येथे अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. कोणताही परवानाधारक दुकान नसताना खुलेआम भर चौकामध्ये अवैधपणे दारू विक्री करतो. या प्रकाराला आळा घालणे राज्य उत्पादन शुल्क किंवा पोलीस विभागाला आतापर्यंत शक्य झाले नाही. आता ही अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद होण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेत आठ दिवसांपासून अभिनव जनजागृती मोहीम राबविणे सुरू केले आहे. सरपंच राधेश्याम झोळे, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, पोलीस पाटील मंगल रामटेके, सदस्य दिनेश फुल्लुके यांच्या आवाजातील ध्वनीफितीवरून दारूबंदी अभियान यशस्वी करा, असे आवाहन पूर्ण गावभर करण्यात येत आहे. संसाराची राखरांगोळी करणार्‍या मदिरेपासून मुक्त होण्यासाठी आणि गावात दारूबंदी अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) दारू सोडा, संसार जोडा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गावकर्‍यांनी सहकार्य करून या रॅलीत मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायत व तंटामुक्त गाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून गावातील अवैध दारू विक्रेत्यांनी ग्रामस्थांना जेरीस आणून सोडले. ही अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी यापूर्वी सुध्दा शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.त्याला काही दिवसांपुरता प्रतिसाद मिळाला. मात्र नंतर अवैध दारू विक्रेत्यांनी पैशाच्या जोरावर बिनापरिश्रमाने आपले बस्तान मांडले. चौका-चौकामध्ये खुलेआम मोठय़ा प्रमाणात अवैधपणे दारू विक्री होत असल्याने दर-दिवशी मद्यपी शौकीनांच्या संख्येत वाढ होत गेली.
संख्येने मोजक्या असलेल्या या अवैध दारू विक्रेत्यांना आळा घालण्याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केल्याने विक्रेतेसुध्दा निर्ढावले. दारूच्या आहारी गेलेल्या अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली.कुटूंबामध्ये भांडणे लागली.गावात शांततेला गालबोट लागले. दुसरीकडे अवैध दारूविक्रेत्यांची गुरमी वाढली. गावातील फक्त ५ अवैध दारू विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी एवढी मोठी मोहीम राबविण्याची पाळी कोणाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामस्थांवर आली, याची चर्चा गावात सुरू आहे.