पीएसआय पदी निवड झालेल्या प्रीती पटलेचा नमाद महाविद्यालयात सत्कार

0
101

गोंदिया (प्रतिनिधी) – गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी असलेल्या प्रीती पटले हिचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल नुकताच सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. यू. खान, प्रा. अर्चना जैन, डॉ. रवींद्र मोहतुरे, राज्यशास्त्र विभागाचे डॉ. एच पी पारधी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे, प्रा. उर्विल पटेल, अनिल मेंढे उपस्थित होते. नमाद महाविद्यालयाच्या वतीने प्रीती पटले हिचा शाल, श्रीफळ देऊन प्राचार्या व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शारदा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबात पालन पोषण होऊन सुद्धा निराश न होता परिस्थितीशी संघर्ष करीत संयम ठेऊन महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात निश्चित ध्येय ठेऊन सातत्याने अभ्यास केल्याने यश मिळाल्याचे सांगून आपल्या यशात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचा मोलाचा वाटा असल्याचे प्रीती पटले हिने सत्काराला उत्तर देताना सांगितले. परिस्थितीचा बाऊ न करता, अपयशाने खचून न जाता प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते, असा कानमंत्र विध्यार्थ्यांना तिने दिला. यावेळी प्राचार्या डॉ. महाजन म्हणाल्या विद्यापीठाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबत आपल्या महाविद्यालयातील विध्यार्थी या स्पर्धेच्या जगात टिकून यश कसे मिळवू शकतील, यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्रयत्न असल्याचे सांगितले. संयम, धैर्य, चिकाटी ठेऊन, ध्येय निश्चित करून महाविद्यालयीन प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेऊन विध्यार्थ्यानी प्रीती पटले हीच्या सारखे यश मिळवावे, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रीती पटले हिच्या यशाबद्दल अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन, भावेश जसानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.