महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकं आणि दुर्मिळ साहित्याचे प्रदर्शन

0
21

विद्यापीठात जयंती सप्ताहाला सुरुवात

मुंबई – १५० हून अधिक पुस्तकं, दुर्मिळ लेख, साहित्य, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, रविवार ३ एप्रिल १९२७ चा बहिस्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक, मुकनायक, जनता साप्ताहिकाचे ऑक्टोबर १९५६ चे हिरक महोत्सवी विशेषांक, एनसाक्लोपिडिया ऑन आंबेडकर, आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, चॅम्पीअन ऑफ ह्युमन राईट्स, एनसाक्लोपिडिया ऑफ दलित एथनॉग्राफी, द आंबेडकर एरा, महात्मा फुले गौरवग्रंथ, शोधाच्या नव्या वाटा, गुलामी, नवे पर्व, महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली विविध पत्रे, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन ग्रंथालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओळखपत्र, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील ११ ऑक्टोबर १९१६ मधील विद्यार्थी पास, ५ जानेवारी १९३१ ला लंडनहून बडोदा येथील महाराजांना लिहीलेले पत्र, वसंत व्याख्यानमालेच्या निमंत्रणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चिटणीस यांनी लिहलेले १५ एप्रिल १९२७ रोजीचे पत्र, कोलंबिया विद्यापीठाचे २५ ऑक्टोबर १९२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहलेले पत्र, राजगृह दादर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंकरदास बर्वे यांना ३० सप्टेंबर १९३६ ला लिहलेले पत्र, समता या पाक्षिकाचा २९ जून १९२८ चा पहिला अंक, त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या मसुद्याची प्रत अशा विविध ग्रंथांबरोबर दुर्मिळ लेखांचा खजिना आज मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु ग्रंथालयात खूला करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२२ या दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व त्यांच्यावरील लिहलेली दुर्मिळ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रसिद्ध कवी, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य आणि चळवळीचे अभ्यासक माननीय ज. वि. पवार,
जयंती सप्ताहाचे निमंत्रक डॉ. अनिल सकपाळ यांच्यासह विद्यापीठातील विविध प्राधिकरणातील सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सात दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून इच्छुकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर, दुपारी १२.४० वाजता कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे प्रसिद्ध कवी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य आणि चळवळीचे अभ्यासक माननीय ज. वि. पवार यांचे “फुले आंबेडकर यांची विचारधारा आणि सामाजिक परिवर्तन” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.