धान खरेदी केंद्रासाठी कोरची तालुकावासीयांचे रास्तारोको

0
12

कोरची दि.11-तालुक्यातील सरपंच व जनतेने एकत्र येऊन आज सोमवारला आदिवासी विकास महामंडळ धान्य खरेदी केंद्र सुरु करीत नसल्याच्या मुद्यावर कोरची- कुरखेडा रिंगरोडवर झंकार बोडी फाट्या जवळ रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात तालुक्यातील २९ सरपंच व उपसरपंच आणि १३० गावातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.या आंदोलनाचे नेतृत्व सरपंच संघटनेचे अध्यक्ष सियाराम हलामी, हेमंत मानकर, नंदकिशोर वैरागडे, शीतल नैताम, राजेश नैताम, प्रतापसिंह गजभिये आदींनी केले. आदिवासी विकास महामंडळ केंद्र हे बंद असल्यामुळे नागरिकांना पडक्या दरात धान्य सावकार  व व्यापार्यानां विकण्याची वेळ आली आहे.
कोरचीसह बेडगाव,बोरी, मारेकस्सा,कोटगुल, ग्यारापत्ती आदी सात ठिकाणाचे केंद्र हे सुरूच झाले नाही. सावकार धान्य कमी किंमतीत विकत घेत असल्याने धान्य कुठे विकायचे हा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे. या आंदोलनात सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर कोरचीचे तालुका अधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन केंद्र सुरु करण्यासंदर्भात त्यांनी सरपंचांशी बोलणी केली आणि केंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्यावरच सरपंचांनी आंदोलन समाप्त केले.