उद्या विदर्भराज्य आंदोलन समिती पाळणार ‘काळा दिवस’

0
21

चंद्रपूर- विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिनांक १ मे २0२२ हा महाराष्ट्राने विदर्भातील जनतेचा विश्‍वासघात केला म्हणून काळा दिवस म्हणून पाळण्याचे आंदोलन घोषित केले आहे. विदर्भाला दिलेल्या वचनाला महाराष्ट्र जागला नाही. म्हणून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी शासकीय कार्यालयासमोरील फलकावर महाराष्ट्र मिटवून त्याठिकाणी विदर्भाचे स्टिकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याने सर्वच बाबतीत विदर्भाची फसवणूक, विश्‍वासघात आणि लूट केली असून आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा प्रण कार्यकर्ते घेणार आहेत. या आंदोलनात विदर्भातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. अँड. वामनराव चटप यांनी माहिती देताना सांगितले की, मिशन २0२३ अंतर्गत ‘विदर्भ आणि मिळवू औंदा’ या घोषणेप्रमाणे १ मे २0२२ रोजी हे आंदोलन होणार असून विदर्भातील सर्व ११ जिल्हे आणि १२0 तालुक्यात कार्यकर्ते गुलामगिरीचे प्रतीक म्हणून हाताला, पायाला व डोक्याला काळ्या पट्टय़ा बांधून शासकीय कार्यालयाच्या बाहेर असलेल्या महाराष्ट्र या फलकांवर विदर्भ असे स्टिकर लावणार असून ‘महाराष्ट्र मिटाओ विदर्भ मिलाओ’ हे आंदोलन होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरही हे आंदोलन होणार असून विदर्भ राज्याचा जयघोष केला जाणार आहे.
विदर्भ राज्याची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून १९0५ पासून ११७ वर्षांपासून सुरु आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या संबंधात नेमलेल्या सर्व समित्या व आयोगांनी विदर्भाचे स्वतंत्र राज्य शिलकीचे व सक्षम होऊ शकते, अशा शिफारसी केल्या आहेत. विदर्भाचा नागपूर कराराप्रमाणे सिंचनाचा ६0 हजार कोटींचा अनुशेष शिल्लक असून सार्वजनिक आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, उद्योग, शिक्षण, ग्रामविकास, आदिवासी विकास, ऊर्जा विभागाचा १५ हजार कोटी रुपयांचा अनुशेष शिल्लक असून एकूण ७५ हजार कोटींचा अनुशेष स्व. अँड. मधुकर किंमतकर यांनी १९९४-२0१७ या कालावधीत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे तज्ञ सदस्य म्हणून पदावर असताना एक पुस्तिका काढून हे सत्य विदर्भातील जनतेपुढे आणले आहे. विदर्भ निर्मितीच्या प्रश्नावर काँग्रेसने विदर्भातील जनतेची फसवणूक केली असून भाजपने विदर्भातील जनतेचा विश्‍वासघात केला आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्राचे महसुली उत्पन्न ४ लाख ३ हजार ४२७ कोटी रुपये असून वर्षभरच्या खर्चासाठी लागणारी रक्कम ही ४ लाख २७ हजार ७८0 कोटी एवढी असून राज्याच्या २0२२-२0२३ चा अर्थसंकल्प २४ हजार ३५३ कोटी रुपये त्रुटींचा आहे. त्यामुळे विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याची क्षमता राज्याची संपलेली आहे. कारण राज्यावर कर्जाचा डोंगर हा ६ लाख ६0 हजार कोटींवर असून राज्य दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभे असून देशातील नंबर १ चे कर्जबाजारी राज्य आहे. राज्यात ३१ मार्च २0२१ पयर्ंत बेरोजगारांची संख्या ४५ लाखांवर होती व कोरोनामुळे २ वर्षात २१ लाख युवक बेरोजगार झाले असून बेरोजगारांची संख्या ६६ लाखांवर गेली आहे. त्यात विदर्भातील बेरोजगारांची संख्या १४ लाख आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिटाओ विदर्भ मिलाओ यासाठी हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती माजी आमदार अँड. चटप यांनी दिली.