वेगळा विदर्भ झालाच पाहिजे”चा नारा देत काळा दिवस पाळून महाराष्ट्र दिनी केला निषेध व्यक्त

0
24

विदर्भाची लूट थांबवा, वेगळा विदर्भ द्या- अतुल सतदेवे

गोंदिया:- “नागपूर करारातील ११ कलमा पैकी एकही कलम पाळल्या गेलेली नाही. म्हणून हा करार विदर्भातील जनतेला मान्य नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी त्याकाळी विदर्भाला झुकतेमाप दिले जाईल व विदर्भाला अपेक्षा पेक्षा जास्त देणार असे आश्वासन दिले होते, पण याउलट आजवर विदर्भाला लूटले गेले” असे प्रतिपादन विदर्भवादी नेते व वि.रा.आं.स. चे जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे यानी केले. गोंदिया जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी स्थानिक डॉ आंबेडकर प्रतिमा चौक , प्रशासकीय भवन समोर काळा दिवस / विदर्भाचा विश्वासघात दिवस म्हणून पाळण्यात आला व विराआस कोअर कमेटीच्या निर्णयानुसार काळी फित बांधून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार चा निषेध करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
पुढे स्पष्ट बोलताना त्यानी म्हटले, “२८ सप्टेंबर १९५३ ला झालेल्या नागपूर करारा प्रमाणे विदर्भाला बळजबरीने महाराष्ट्रात विदर्भातील जनतेची इच्छा नसताना शामील केले गेले व १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्राचीन काळा पासून ओळख असलेला वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड असा प्रदेश आज दारिद्री , गरिबी, कर्जबाजारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी नक्सलवाद करता ओळखल्या जात आहे. विदर्भात २३ प्रकारचे खनिज पदार्थ असून त्यावर उद्योग नाही, वीज येथे तयार होत असून शेतकऱ्यांना लोडशेडींग चा सामना करावा लागतो, सिंचनाची सोय नसल्याने मागील १५ वर्षात ४७ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, उद्योगाला पुरेशी वीज नाही म्हणून विदर्भात उद्योग नाही. त्यामुळे विदर्भातून युवकांचे पालायन मोठ्या प्रमाणात होत आहे, २५ लाखाहुन अधिकची जनसंख्या कमी झाली, त्याचापरिणाम म्हणजे ४ आमदार, १ खासदार कमी झाला, विदर्भात कापसाचे मोठया प्रमाणात पीक घेतले जाते. परंतु त्यावरील कापड कारखाने पश्चिम महाराष्ट्र मध्ये आहेत. विदर्भातील कापड कारखाने कट रचून बंद केले गेले. जंगल संपत्ती विदर्भातील पण त्यावरील कारखाने पश्चिम महाराष्ट्रात! मग अश्यात विदर्भातील युवकांचे स्वप्न भंगल्याने तो निराशावादी होत चाललेला आहे. नक्षलवादी चळवळी बळकट होत आहेत, या सर्व परिस्थिती ला जवाबदार कोण? यशवंतराव चव्हाण विदर्भातील जनते करीता खलनायक ठरले आहेत, विदर्भाच्या जनतेशी त्यांनी विश्वासघात केला आहे. व विदर्भाला सातत्याने लुटलेले आहे. म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने विश्वासघात दिवस पाळून, केंद्र सरकारला विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगढ व मध्यप्रदेश ची बॉर्डर लागलेली आहे, छत्तीसगड चा विकास आम्ही स्वतः डोळ्याने बघितला असून आज तेथून कामाला येणारा कामगार वर्ग दिसायला मिळत नाही. कारण छत्तीसगढ हे लहान राज्य निर्माण झाल्यावर तेथे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. आज गोंदिया जिल्ह्यात खनिज पदार्थ चा मोठा साठा असून सुद्धा रोजगार नाही च्या बरोबर आहे, आमच्या कडील युवक उलट विविध राज्यात पलायन करीत आहे, रोजगाराच्या संधी नाही, सालेकसा, देवरी व आसपास च्या परिसरात नक्षलवाद पनपत आहे पण कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही.”
या आंदोलनात वि.रा.आ.स.चे जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे सह , शहर प्रमुख वसंत गवळी, नंदा ताई राऊत, रीना अग्रवाल, सुनील भोंगाड़े, रवि भांडारकर, परमेश्वर मदारकर अन्य पदाधिकारी व विदर्भवादी उपस्थित होते.