१५ ऑगस्टपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार- उषा मेंढे

0
10

गोंदिया दि. २१: जिल्ह्याला वर्षभरात हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला असला तरी येत्या १५ ऑगस्टपर्यंतच जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी व्यक्त केला.
स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या विशेष आढावा सभेत तथा स्वच्छतादूत भारत पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजनसुद्धा केले असून जिल्हा परिषदेतील आठ विभागप्रमुखांना आठ तालुक्यांचे संपर्क अधिकारी करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आर.एल. पुराम, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आर.एम. चव्हाण या वेळी उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या ओघवत्या वाणीतून स्वच्छतादूत भारत पाटील यांनी स्वच्छतेबाबत चांगलाच जोश भरला. ते म्हणाले, शौचालय बनविणे हे केवळ स्वच्छता विभागाचेच कार्य नाही, तर ती सामूहिक जबाबदारी आहे.सिक्कीम, हिमाचल प्रदेशसारखा गोंदिया जिल्हा दुर्गम नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील जिल्ह्यासारखा गोंदिया जिल्हा मागास नाही. प्रत्येक अधिकार्‍याने आपल्या क्षेत्रात नित्य शौचालयाचा आढावा घेतल्यास जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन करुन देशातील आदिवासी जिल्हा म्हणून हागणदारीमुक्त होणारा गोंदिया जिल्हा पहिला असेल, असा निर्धार करण्याचे आवाहन भारत पाटील यांनी केले.
‘माझ्या बायकोला कुणी दुसर्‍याने साडी घेतली तर मला चालेल का?’ असा सवाल उपस्थित करुन केवळ अनुदानावर अवलंबून राहणार्‍या व्यक्तींचासुद्धा त्यांनी या वेळी चांगलाच समाचार घेतला. केवळ मतदार संघ नव्हे, तर संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला.
जिल्ह्यात २0१२ च्या सर्व्हेक्षणानुसार ९0 हजार वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करावयाचे आहे.३१ हजार वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम मार्च अखेरपर्यंत तर उर्वरित बांधकाम १५ऑगस्टपर्यंत करावयाचे आहे. जे सगळ्यांचे, ते कुणाचेच नसते. त्यामुळे जबाबदारी निश्‍चित करुन जिल्हा परिषदेतील आठ विभागप्रमुखांना पालक अधिकारी तालुके वाटून देण्यात आले. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी आणि पालक अधिकारी यांनी नियोजन करुन उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे यांनी केले.
जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख यांनी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी केलेले सविस्तर नियोजन आपल्या मार्गदर्शनातून सांगून चालू वर्षाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत साध्य करण्याचे गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी आर.एम. चव्हाण यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
याप्रसंगी स्वच्छतादूत भारत पाटील यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन स्वच्छ भारत मिशनच्या समाजशास्त्र तज्ज्ञ दिशा मेश्राम यांनी केले. आभार जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख यांनी मानले.