लेखी आश्‍वासनानंतर उपोषण सुटले

0
6

अर्जुनी-मोरगाव : विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणाची लेखी आश्‍वासन मिळाल्यामुळे उपोषणाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता सांगता झाली.उपोषणकर्त्याचे समाधान झाल्याने नियोजित रास्ता रोको आंदोलनही झाले नाही. 
प्राप्त माहितीनुसार, शेतकर्‍यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाला माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र अनेक सावकारांनी बनावट पावत्या देऊन कर्जदारांचे सोने तारण ठेवले. बनावट पावत्या असल्यामुळे अनेक कर्जदार कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित आहेत. अशा सावकारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावे तसेच वडेगाव/स्टेशन परिसरातील पडझड अनुदानामध्ये झालेल्या घोटाळ्याची पुनचरैकशी करण्याच्या मागणीसाठी ८फेब्रुवारीपासून विजय खुणे व हिराजी बावणे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
१0 फेब्रुवारी रोजी सहाय्यक निबंधक संजय सुरजुसे यांनी दोन सावकारांविरूध्द गुन्हा नोंदविण्याची लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दिली.त्यानुसार सावकारांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. निबंधक कार्यालयात प्राप्त होणार्‍या अन्य सावकारांविरूध्दच्या तक्रारींची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्याचे लेखी आश्‍वासन सुरजुसे यांनी दिले.मौजा वडेगाव/स्टेशन येथील पडझड अनुदान वाटपात घोळ व खोट्या स्वाक्षर्‍या प्रकरणात उपविभागीय अधिकारी गोंदिया यांनी तलाठी व कोतवाल यांना निलंबित केले होते.या अनुदान वाटपातील त्रुट्या असल्यास त्याची शहानिशा करून आपदग्रस्तांना योग्य न्याय देण्याचे आश्‍वासन तहसीलदार डी.सी. बाम्बोर्डे यांनी दिले. त्यानंतर बाम्बोर्डे यांनी लिंबू शरबत पाजल्यानंतर उपोषणाची सांगता झाली.