माकडीच्या सरपंच यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगनादेश

0
23

गोंदिया : तालुक्यातील माकडीच्या सरपंच त्रिवेणी भरत हनवते यांना अप्पर आयुक्त यांनी अपात्र ठरविले होते या निर्णयाविरोधात सरपंच हनवते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले असता न्यायालयाने सरपंच पद- अपात्रतेवर स्थगनादेश दिला आहे. माकडी ग्रामपंचायतची निवडणूक फेब्रुवारी २0१८ मध्ये झाली. सरपंच म्हणून त्रिवेणी हनवते या निवडून आल्या. मात्र त्यांचे सासरे मदनलाल हनवते यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच त्रिवेणी हनवते यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी तक्रार कृष्णकुमार नागपुरे, कमलाप्रसाद तुरकर, आसाराम करचाल आदींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. अप्पर आयुक्त नागपूर यांनी तक्रारीवर निर्णय देत सरपंच त्रिवेणी हनवते यांना अपात्र ठरविले. या निर्णयाविरोधात सरपंच हनवते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केली. यावर न्यायालयाने त्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला तुर्तास स्थगनादेश दिला आहे.