आरोग्यदायी जीवन शैली पाळू या, कर्करोगाला दुर ठेवू या !-डॉ. नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी

0
17

घाबरु नका ! पण जागरूकता हवी ,

प्राथमिक कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आला तर तो अगदी सहज बरा होऊ शकतो.
                     
गोंदिया,दि.07-– भारतात 7 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ साजरा केला जातो. या दिवशी कर्करोगासारख्या धोकादायक आजाराबद्दल जनजागृती केली जाते. कर्करोग आणि त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 2014 मध्ये, आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाचे मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या आजाराला वेळीच पकडण्याची गरज ओळखून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी कर्करोगाशी लढण्यासाठी दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिन पाळतात.
कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. पहिल्यांदा जेव्हा कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कधी कधी कर्करोग शरीरात असूनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तस तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कर्करोगापासून वाचवणारे उपचारही आलेत. पण तरी आजही जनमानसात कर्करोगाबद्दल जागरुकता नाही किंवा त्यांना त्याबद्दल काही माहिती नाही. त्याच दृष्टीने थोडी जागरुकता निर्माण करणे आवश्यक बनल्याची माहिती डॉ. नितीन वानखेडे यांनी या वेळी दिली.
धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, अति चरबीयुक्त आहार, विषारी रसायनांसोबत काम करणे किंवा निवासस्थानाच्या परिसरात अति रसायनांचा वापर, आनुवंशिकता, काही विषाणूंशी संपर्क आल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इ. कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. कर्करोग असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दरवर्षी सु. ११ लाख नागरिकांना कर्करोगाची बाधा होते व त्यातील सु. ५ लाख लोक या आजारामुळे बळी पडतात अशी माहिती नॅशनल रजिस्ट्री प्रोग्राम मध्ये देण्यात आली आहे. जगातील दर सहा मृत्यूमागे एका मृत्यूचे कारण कर्करोग असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये उघड झाले आहे. कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याच्या प्रतिबंधास प्रोत्साहन देणे याकरिता 7 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ साजरा साजरा करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.
कर्करोग हा आता एक सामान्य आजार झाला आहे त्यामुळे त्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे की नक्की कर्करोग आहे तरी काय? आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं आणि शरीराचा विकास हा पेशी दुभंगल्यानेच होतो. जोवर आपण 18 वर्षांचे होतो तोवर ह्या पेशी अरबो वेळा दुभंगल्या जातात. पेशींचं हे विभाजन एका रचनेनुसार होतं असतं आणि ते नियंत्रणात असतं. कर्करोगाचा आजारही याच पेशींच्या विभाजनामुळे होतो. पेशींचे विभाजन हे आपल्या शरीराच्या विकासासाठी अतिशय गरजेचे आहे, पण हे विभाजन नियंत्रणात रहायला हवे. जर हे विभाजन नियंत्रणाबाहेर गेले की माणूस कर्करोगाला बळी पडतो.
कर्करोगावर काय उपचार केले जाऊ शकतात?

  • कर्करोगासाठी अनेक प्रकारचे उपचार आहेत. हे उपचार व्यक्तीच्या शरीरात कर्करोग किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून आहे.
  • कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन थेरपी इत्यादी उपचार पर्याय केले जातात.
  • कर्करोगाच्या उपचाराची पद्धत देखील रुग्णाच्या आरोग्यावर आणि त्याच्या कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असते.
  • जर कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आला तर तो अगदी सहज बरा होऊ शकतो.