काटोल तालुक्यात गारपीट

0
12

काटोल -तालुक्यातील कोंढाळी परिसरात तसेच सावनेर तालुक्यातील वाकी परिसरात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या परिसरात वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यातच काही भागात बोर तर काही भागात आवळ्याच्या आकाराची गारपीट झाल्याने संत्र्यासह रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

शुक्रवारी दुपारी कोंढाळी परिसरातील कोंढाळी, मासोद, कामठी, खैरी, जाटलापूर, चिखली तसेच लगतच्या वर्धा जिल्ह्यातील धानोली,नागाझिरी, मेट, काटोल तालुक्यातील कचारीसावंगा, सोनपूर, वाई, पंचधार शिवारात वादळी पावसासह गारपीट झाली. या शिवारात अंदाजे एक तास पाऊस कोसळला. त्यामुळे संत्रा व मोसंबी गळाली असून, गहू, हरभरा, कपाशी यासह भाजीपाल्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. माहिती मिळताच आ. डॉ. आशिष देशमुख, पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, उपसभापती योगेश चाफले, शेषराव चाफले, तहसीलदार सचिन गोसावी, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. हरिभजन धारपुरे आदींनी कोंढाळी परिसरातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे गहू व हरभऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्ह्यात यापूर्वीही गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने अद्यापही सर्वेक्षण केले नाही. त्यामुळे शेकऱ्यांत असंतोष निर्माण होत आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून शासनाने योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.