धुमाकूळ घालणारी वाघीण अखेर जेरबंद

0
24

मोहाडी-तालुक्यातील मांडेसर येथील शेतशिवारातील मिरचीच्या बागेत दोन दिवसांपासून ठाण मांडलेल्या वाघिणीला अखेर वनविभागाने आज दुपारी जेरबंद केले. नागरी वस्ती जवळ असल्याने प्रचंड गर्दीच्या साक्षीने पाच तास चाललेल्या या जॉइंट रेस्क्यू ऑपरेशननंतर या वाघिणीला पकडण्यात आल्याने वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.
मांडेसर येथील वालचंद दमाहे यांच्या शेतात या वाघिणीने दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. दोन दिवसांपूर्वी या वाघिणीने मांडेसर-कान्हाळगांव रस्त्यालगत शेखर कस्तुरे यांच्या शेतात एका रानडुकराची शिकार केल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. बुधवार सकाळी आठ वाजेदरम्यान मांडेसर परिसरात ही वाघीण अनेकांना दिसून आल्याने परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
वन विभागाला सूचना मिळाल्यानंतर या वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. वाघिणीच्या ठिकाणापासून वन क्षेत्र जवळपास २0 किमी अंतरावर असल्याने वाघिणीला जेरबंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. भंडारा वनविभागाचे कर्मचारी व आंधळंगाव पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने जवळपास ११ वाजेनंतर वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. वन विभाग आणि पोलिस कर्मचार्‍यांनी वाघिणीला बघण्यासाठी आलेल्या बेशिस्त गर्दीला थोपवत अखेर सायंकाळी ४.३0 वाजता वन विभागाच्या तज्ञांद्वारे वाघिणीला बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देत यशस्वीरित्या जेरबंद केले.
पिंजर्‍यात जेरबंद केल्यानंतर वाघिणीला तुमसर भागातील चिचोली लाकूड आगार येथे नेण्यात आले असून मध्यरात्री उशिरा वाघिणीला तिच्या अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती भंडारा उपवन संरक्षक राहुल गवई यांनी दिली.