फुले शाहू आंबेडकर विचारमांचावरून कर्मयोगी गाडगेबाबा साहित्य नागरीत पेटणार विद्रोहाची मशाल

0
13

समकालीन साहित्य, संस्कृती, साहित्य व इतिहास यावर प्रकाश टाकणारे एकूण चार परिसंवाद, तीन कवी व गझल संमेलने, विद्रोही विचार यात्रा, विशेष मुलाखत, विविध विषयांवरील गटचर्चा

17 व्या अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम पत्रिका

रसिका आगाशे आयुब उद्घाटक तर डॉ. यशवंत मनोहर न्या.बी.जी.कोळसे पाटील प्रमुख पाहुणे

वर्धा,दि.30ः-एकीकडे राजाश्रयातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असताना दुसरीकडे लोकाश्रयातून त्याच तारखांना होणाऱ्या सतराव्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनामुळे साहित्य रसिकांना विद्रोहीच्या कार्यक्रमपत्रिकेबद्दल मोठी उत्सुकता लागली होती. ती उत्सुकता आता संपली असून आज विद्रोही संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अधिकृतपणे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे व मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. महारष्ट्रातून नंदुरबार, धुळे, पुणे , मुंबई, लातूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर आदी जिल्ह्यातून विचारवंत, अभ्यासक, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संमेलनाचे उद्घाटन 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध लेखिका सिने अभिनेत्री व नाट्य दिग्दर्शिका रसिका आगाशे-अय्युब, मुंबई यांच्या हस्ते होणार आहे तर या संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ पत्रकार ‘गांधी का मरत नाही’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व विविध सामाजिक चळवळीत अग्रणी काम केलेले चंद्रकांत वानखडे भुषवणार आहेत. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते, पुणे, प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर , नागपूर , माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अजिज नदाफ, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. रामप्रसाद तौर तसेच झरना झव्हेरी, मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी विद्रोही जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण, बोधचिन्हकार व गीतकार यांचा सत्कार होणार आहे. मुख्य उद्घाटन सोहळ्यापुुर्वी शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना हारार्पण करून सकाळी ८.३० पासून छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून विद्रोही साहित्य संस्कृती विचार यात्रेची झाँकी
शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संमेलनस्थळी पोहोचणार आहे.

मुख्य सभामंडपाला ग्रामगीतकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांंचे नाव देण्यात आले आहे तर मुख्य विचारपीठाला फुले शाहू आंबेडकर विचार मंच असे नाव देण्यात आले आहे. विद्रोही साहित्य संमेलन ज्या सर्कस ग्राऊंड वर होणार आहे त्या संपुर्ण परिसराला ‘कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे.

या संमेलनाचा समारोप प्रसिद्ध न्यायमूर्ती बि. जी. कोळसे पाटील यांचे हस्ते होणार आहे. यावेळी समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, सुप्रसिद्ध पत्रकार रणजीत मेश्राम, अँँड. गणेश हलकारे, , निरंजन टकले प्रसिद्ध लेखक, गंगाधर बनबरे इत्यादिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या संमेलनाचे समारोपीय सत्रामध्ये आंतरजातीय धर्मिय विवाहितांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
या संमेलनात १) मराठी साहित्य संस्कृतीला अब्राह्मणी धर्म प्रवाहांनीच समृद्ध केले, २) लेखकाची सांस्कृतिक भुमिका काय आहे? काय असावी ?; ३) महामानवांची बदनामी, माफीविरांचे उदात्तीकरण, इतिहासाचे विकृतीकरण आणि संस्कृतीच्या मिरासदारांचे राजकारण; ४) सत्यशोधक समाज, स्वातंत्र्य चळवळ ते दलित पँथर, महाराष्ट्राचा प्रवास आणि मराठी साहित्याच्या सामाजिक बांधीलकीचा अनुशेष या विषयावर चार परिसंवादातून समकालीन साहित्य, संस्कृती सोबतचा लढवू ऐतिहासिक वारसा जपण्याचा व पुढे नेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन वैशिष्ट्यपूर्णरीत्य करण्यात आले आहे.

वऱ्हाडी शब्दकोषकार कवी देविदास सोटे स्मृतीस समर्पित कवी व गझलकार संमेलन, गझलकार रामदास कुहिटे यांच्या स्मृतीस समर्पित कवी व गझलकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश वाकुडकर, अनंता राऊत, डाॅ. भुषण रामटेके, खेमराज भोयर ,यशवंत मकरंद अशा प्रसिद्ध कवींचा सहभाग राहिल.

या संमेलनात ‘गाणी परिवर्तनाची, महाराष्ट्र दर्शन, द नेशन हा द्विपात्री नाट्य प्रयोग, ज्योती झाली ज्वाला हा एकपात्री प्रयोग, मी भिडेवाडा बोलतो हा एकपात्री प्रयोग, मी सावित्री ज्योतीराव फुले हा एकपात्री प्रयोग, सावित्रीच्या लेकिंच्या व्यथा हा प्रयोग,’ चित्रकाव्य व पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच व्यंगचित्र प्रदर्शन आणि महात्मा फुले शिष्या मुक्ता साळवे बालमंच हे विशेष आकर्षण राहणार आहे.

समकालीन सामायिक महत्वाच्या मुद्दयांवर उदा. नवे शैक्षणिक धोरण, माध्यमांची गळचेपी, जातिनिहाय जनगणना, कोरोना नंतरचे वास्तव व स्त्रियांसमोरील आव्हाने, विदर्भातील शेती प्रश्न, एल.जी.बी.टी.क्यु. समुदाय व त्यांचे प्रश्न, भटके विमुक्त यांच्या चळवळी, संविधान संस्कृती, पर्यावरणाचा ऱ्हास, विकासाचा अनुशेष, महात्मा गांधी, विनोबा भावे आदि विषयांवर गटचर्चांचे आयोजन संमेलनाच्या दुस-या दिवशी करण्यात आले आहे. १२ पानी Patrika विद्रोही ने आज जाहीर केली . १० नाट्य प्रयोग, एकपात्री,दविपात्री, प्रयोग असून ४ चळवळ गीते, संस्कृती दर्शन कार्यक्रम, ४ परिसंवाद १६ गटचर्चा यांचा समावेश विद्रोहीत आहे.संमेलनाच्या पूर्व संध्येला वर्हाडी बोलीतील जनवादी नाटक व्हाया सावरगाव खुर्द , सोबतच सीएए-एनआरसी प्रश्नावरील नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन प्रांगणात सादर होणाऱ्या नाटकाचा लाभ सर्व रसिकांनी घ्यावा असे आवाहन राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे व नितेश कारळे यांनी केले आहे.