कॅन्सर जागरुकता रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

0
14

गोंदिया,दि.7 :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने आयोजित जागतिक कॅन्सर दिन जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व डॉक्टर यावेळी उपस्थित होते. चिन्मय गोतमारे यांनी रॅलीत सहभागी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

        कॅन्सर जनजागृतीपर रॅलीत महाविद्यालयीन एम.बी.बी.एस. विद्यार्थी व नसिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया ते हनुमान मंदीर, सिव्हील लाईन, बाजपेई ड्राईव्हिंग स्कुल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयस्तंभ चौक येथुन के.टी.एस.रुग्णालयात संपन्न झाली. रॅलीमध्ये विविध मानवी अवयवांचे होणारे कर्करोग, महिलांमध्ये होणारा स्तनाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग इत्यादी बाबत घोषणा देत तसेच दर्शनी बॅनर व फलकांव्दारे जनजागृती करण्यात आली.

         रॅलीची सांगता डॉ. संजय माहुले, उपवैद्यकीय अधीक्षक यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी यांना जागतीक कॅन्सर दिन विषयी तसेच या आजाराविषयी व या वर्षीच्या थिम, “क्लोज द केअर गॅप” विषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ. अपुर्व पावडे, विभागप्रमुख कान, नाक व घसा विभाग, डॉ. प्रशांत तुरकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक, वरिलायंस कॅन्सर रुग्णालयाचे कर्करोग विशेषज्ञ डॉ. सौरभ मसराम तसेच डॉ. अनिल आटे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, डॉ.सुलभ रहांगडाले, श्री.राकेश हत्तीमारे, श्री.सुर्यवंशी, प्रभारी अधिकारी, शहर पो.स्टे. गोंदिया हे प्रामुख्याने उपस्थित होते.

         डॉ.मनोज तालापल्लीवार, डॉ. संजय माहुले व डॉ. शिल्पा पटेरिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी रॅलीचे संपुर्ण संयोजन व नियोजन सुनियोजितपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय डोंगरे, समाजसेवा अधीक्षक, हरिचंद कटरे व सचिन ढोले यांनी सहकार्य केले.