तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे पुढील महिन्यात सुरू करा-पालकमंत्री संजय राठोड 

0
12
वाशिम दि.4 – संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे अंदाजपत्रके तयार करण्याचे आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम या महिन्यात पूर्ण करून पुढील महिन्यात कोणत्याही परिस्थितीत दोन्ही आराखड्यातील कामे सुरू करावी.असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
    आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पोहरादेवी व उमरी येथील दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांचा आढावा आयोजित सभेत श्री राठोड यांनी घेतला.यावेळी ते बोलत होते.सभेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,उपवनसंरक्षक अभिजित वायकोस,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेस हिंगे, महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
          पालकमंत्री श्री राठोड म्हणाले, दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखडे त्वरित अंतिम करून जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात यावे.आराखडे तयार करताना दूरदृष्टीने त्यामध्ये वाहन पार्किंग,पिण्याचे पाणी व विद्युत व्यवस्था यांचा समावेश करावा.आराखड्यातील कामांचे व्यवस्थापन व स्वच्छता कायम राहील याबाबतचा देखील आराखड्यात समावेश करण्यात यावा.दोन्ही विकास आराखडयासाठी जी शासकीय जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे, त्यावर असलेली अतिक्रमणे त्वरित हटवून जागा खुली करण्यात यावी. विकास आराखड्यातील समाधी व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आणि भक्तनिवास ठिकाणी आवश्यक असलेल्या जागेवर चांगले प्रवेशद्वार तयार करण्यात यावे, असे ते म्हणाले.
              पोहरादेवी येथे संत रामराव महाराज बायोलॉजिकल पार्कचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे असे सांगून पालकमंत्री श्री राठोड म्हणाले,उमरी येथील विकास आराखडयात संत जेतालाल महाराज व सामकी माता मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांसाठी भोजन कक्ष बांधकामाचे नियोजन आराखड्यात करावे.त्यामध्ये पिण्याच्या पाणी व विद्युत व्यवस्थेचा समावेश असावा असे त्यांनी सांगितले.
          यावेळी श्री.षण्मुगराजन यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आवश्यक असलेली शासकीय जमीन अधिग्रहित करण्यासाठी आणि आराखड्यातील कामे सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आराखडयाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी आराखड्याशी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व संबंधित वास्तुविशारद उपस्थित होते.