ॲड.लखनसिंह कटरे यांना वेध प्रतिष्ठान, नागपूरचा साहित्य वेध पुरस्कार प्रदान

0
16

नागपूर,दि.08ः  येथील वेध प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. सन 2022-23 चा “बोली महर्षी डाॅ.हरिश्चंद्र बोरकर साहित्य वेध पुरस्कार” गोंदिया जिल्ह्यातील बोरकन्हार येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, विचारवंत व बोली अभ्यासक ॲड.लखनसिंह कटरे (निवृत्त डीडीआर) यांना प्रदान करण्यात आला. दि.05 मार्च ला नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. याप्रसंगी ॲड.लखनसिंह कटरे यांना डाॅ.तीर्थराज कापगते यांच्या हस्ते पुरस्कार राशी रु.2100/-, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व पुरातत्ववेत्ते डाॅ.मनोहर नरांजे, निवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे तथा इतर पुरस्कार विजेत्यांसह वेध प्रतिष्ठानचे सदस्य व इतर श्रोते मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना वेध प्रतिष्ठानचे सचिव खुशाल कापसे यांनी करून त्यांनी वेध प्रतिष्ठानद्वारे केलेल्या व पुढे करण्यात यावयाच्या कामाचा आढावा सादर केला. ॲड.लखनसिंह कटरे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डाॅ.अश्विन किनारकर यांनी केले. सदरील मानपत्रात श्री.कटरे यांच्या पुस्तकांच्या शीर्षकांची अतिशय सुंदर अशी अर्थपूर्ण गुंफण सुद्धा करण्यात आली आहे
पुरस्कार स्वीकारल्यानंतर ॲड.लखनसिंह कटरे यांनी आपले संक्षिप्त मनोगत व्यक्त केले. श्री.कटरे यांनी त्यांच्या साहित्यिक असण्याच्या व वाचन-लेखनाच्या हकिकती सांगून थोडक्यात आपला जीवनपट सुद्धा उलगडून दाखवला. त्यांनी सांगितले की ते मराठी, हिंदी व इंग्रजीतून प्रकाशित होणाऱ्या 54 विविध नियतकालिकांचे वैयक्तिक वर्गणीदार-वाचक आहेत. श्री.कटरे हे मराठी, हिंदी, इंग्रजी, झाडीबोली व पोवारी बोलीत विविध साहित्य लिहित असून आजवर त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय त्यांची आणखी पाच पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. तसेच मराठी व हिंदीतील विविध नियतकालिकांतून त्यांचे विचार व लेख सुद्धा नियमित प्रकाशित होत असतात. या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे संचालन वेध प्रतिष्ठानच्या एक मान्यवर सदस्या यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन शंकर जीवनकर यांनी केले.