मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना;वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजारांचे अनुदान

0
36

योजना शेतकरी विकासाच्या

 गोंदिया, दि.30 :कृषि आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे मिळणार आहेत. विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम 75 हजार रुपये अनुदान आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने भरल्यानंतर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड होईल. ऑनलाईन अर्ज मोबाईल, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायती मधील सामुदायिक सेवा केंद्र यासारख्या माध्यमातून http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करता येतो. शेततळ्याचा लाभ संरक्षित सिंचन क्षेत्रासाठी रब्बी, उन्हाळी पिकांना सरंक्षित पाणी देण्यासाठी होऊ शकेल, त्याचप्रमाणे मत्स्यपालन पशुसंवर्धनासाठी होऊ शकेल. त्यासाठी 23 रुपये 60 पैसे शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. सोडतीतून निवड झालेल्या शेतक-यांना त्याच्या जमिनीचा सातबारा, अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र, जातीचा दाखला महाडीबीटी पोर्टलवर विहीत मुदतीत अपलोड करावा लागेल.

निवड झालेल्या शेतक-यांच्या शेतात कृषी अधिकारी भेट देतील, तसेच छाननी अंती पात्र ठरलेल्या शेतक-यांना कार्यारंभ आदेश ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करण्यात येईल. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे व सामुहिक शेततळे या घटकाकरिता लाभ घेतलेला नसावा.

महाडीबीटी प्रणालीवर एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज येतात, त्यामुळे ज्यांची निवड झाली ते वगळून उर्वरित शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी लावली जाते. त्यानुसार टप्याटप्प्याने त्यांची निवड केली जात असल्यामुळे प्रत्येकवेळी संबंधीत शेतक-यांनी अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर मुदतीत मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.