24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ बुद्ध आणि मार्क्स च्या विचारानेच शोषणमुक्त समाजाची निर्मिती शक्य- कॉम्रेड हिवराज उके

बुद्ध आणि मार्क्स च्या विचारानेच शोषणमुक्त समाजाची निर्मिती शक्य- कॉम्रेड हिवराज उके

0
23
भंडारा -:  विश्वशांती आणि दुःखापासून मुक्तीचे मार्गदाते तथागत गौतम बुद्ध आणि शोषणमुक्तु समाजवादी जगाच्या निर्मितीसाठी कम्युनिस्ट जाहीरनाम्याचे जनक काॅम्रेड कार्ल मार्क्स या दोन्ही महामानवांच्या  विचारांची सांगड घालूनच शोषणमुक्त समताधिष्ठित समाजवादी समाजाची निर्मिती शक्य आहे असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी अभिवादन सभेत व्यक्त केले आणि त्यांना क्रांतिकारी जय भिम लाल सलाम करून अभिवादन केले.
      दिनांक 5 मे 2023 ला भाकप च्या वतीने राणा भवन भंडारा येथे तथागत गौतम बुद्ध यांची 2585 वी जयंती व काॅ. कार्ल मार्क्स यांची 205 वी जयंती प्रीतीर्थ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
      सभेच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड माणिकराव कुकडकर होते तर कॉम्रेड हिवराज उके व काॅ. प्रियकला मेश्राम (लेखिका) यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या जिल्हा सचिव कॉम्रेड मीनाक्षी मेहर,त्रिरत्न बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा कॉम्रेड महानंदा गजभिये,  किसान सभेचे काॅ. वामनराव चांदेवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
     याप्रसंगी भाकप कार्यकर्ते दिवंगत कॉम्रेड गोपीचंद भोयर यांच्या दिनांक 5 मे ला दुःखद निधनाबद्दल त्यांना पक्षातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच या सभेत भाकपच्या राज्य कौंसिलच्या आव्हानानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूचा रिफायनरी प्रकल्प रद्द करून स्थानीय जनतेवरील दडपशाही बंद करावी, देशासाठी पदक मिळवून देणाऱ्या महिला पहेलवान खेळाडूंचे यौन शोषणाचे आरोप असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रजभूषण  शरणसिंह यांना त्वरित अटक करून योग्य चौकशी करण्यात यावी, अतिक्रमित घरकुलधारकांना पट्टे व बेघरांना घर, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते दुरुस्ती, साफसफाई, प्रसाधनगृहे, राशन, निराधारांचे नियमित व फरकासह वाढीव अनुदान, सुरक्षा भिंत, मोलकर्णींना पेन्शन व सन्मानधन इत्यादी मागण्यांसाठी दिनांक 15 मे पासून मा. जिल्हाधिकारी,मा. तहसीलदार व मा. मुख्याधिकारी न.प. यांच्या कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व सत्याग्रह आंदोलन व तत्पूर्वी जनजागृती करण्याच्या निर्णय काॅ. हिवराज उके यांनी जाहीर केला. आणि देशात व राज्यात महागाई, बेरोजगारी वाढवणाऱ्या व एकूणच जनविरोधी धोरण राबवणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करून भाजप हटाव- देश बचाव, संविधान बचाव, भाजप हटाव महाराष्ट्र बचाव या घोषणा देत जनजागरण अभियान राबवण्यात आला.
      कार्यक्रमाचे संचालन तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचेे यांनी केले.  तर आभार कॉम्रेड मोहन सेलोकर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने कॉम्रेड गौतम भोयर, दीपक गजभिये, गोपीचंद गोमासे, युवराज नंदनवार, सौरभ नागोसे, दिलीप क्षीरसागर, वीरांगणा बागडे, उर्मिला वासनिक, सरस्वता देशमुख, छबी पाचे, गोपाल चोपकर,प्रज्ञा मेश्राम,उषा सुर्यवंशी,घनश्याम नागोसे  इत्यादींची उपस्थिती होती.
blank