ओबीसी जनगणनेला घेऊन विदर्भात दोन टप्प्यात निघणार मंडल आयोग जनजागृती यात्रा

0
18

नागपूर,दि.08: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजासह सर्वांचीच जातनिहाय जनगणना भारत सरकारने करुन संविधानिक हक्क अधिकार व वाटा देण्याच्या मागणीला घेऊन यावर्षीही मंडल यात्रा दोन टप्यात काढण्यात येणार आहे.या मंडल यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यात येणार आहे.पहिल्या टप्यात विदर्भातील सात जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा काढण्याचा निर्णय येथील एमटीडीसीच्या सभागृहात रविवार(दि.07)ओबीसी संघटनाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यात्रेचा पहिल्या टप्याची सुरवात 30 जुलैला संविधान चौक नागपूर येथून होणार आहे.नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली, वर्धा,यवतमाळ या जिल्ह्यातून प्रवास करत चंद्रपूर शहरात मंडल दिवशी 7ऑगस्टला यात्रेच्या पाहिल्या टप्प्याचा समारोप होणार आहे. तर दुसरा टप्याची सुरवात 20 ऑगस्टला राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथून करण्यात येणार असून अकोला,वाशिम जिल्ह्यातून प्रवास करत 25 ऑगस्टला मंडल जयंतीच्या दिवशी भाऊसाहेब उपाख्य डॉ.पंजाबराव देशमुख नगरी अमरावती येथे दुसऱ्या टप्प्याचा समारोप करण्यात येणार आहे.या संदर्भात झालेल्या ओबीसी संघटनांच्या बैठकीला भंडारा,गोंदिया,नागपूर,यवतमाळ,वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली,आणि नागपूर ग्रामीण येथील कार्यकर्ते मंडल यात्रा संयोजक उमेश कोर्राम,बळीराज धोटे,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,दीनानाथ वाघमारे,खेमेंद्र कटरे, भुमेश्र्वर शेंडे,गोपाल सेलोकर, अनिल डहाके,विलास माथनकर,डॉ.अंजली साळवे,अतुल खोब्रागडे सुनील पाल,पियूष आकरे ,देवेंद्र समर्थ,मनीष गिरडकर,प्रतीक बावनकर,प्रलय मशाखेत्री, मुकुंद अडेवार, राजेंद्र बढिये, सोनू फटींग, निलेश तिघरे, अरविंद क्षिरसागर, विशाल पटले,उपस्थित होते.

विदर्भात निघणार्या या मंडल यात्रेदरम्यान ओबीसींना जोड़ण्यासोबतच जातनिहाय जनगणना कशी महत्वाची आहे,हे पटवून देण्यात येणार आहे.ओबीसी व्हीजेएनटी,एसबीसी समाजातील विविध प्रश्न आणि  त्यावरील उपायावर चर्चा, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जागृती, ओबीसींचे वसतिगृह, महाज्योतीच्या आणि ओबीसी आर्थिक विकास महामंळाच्या योजना, शिष्यवृत्तीचा लाभ, ओबीसींची जनगणना आदी अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.यात्रेच्या माध्यमातून ओबीसी हितासाठी गठित बी.पी. मंडल आयोगाच्या शिफारशींची माहिती ओबीसी समाजाला देऊन या शिफारशी आज परिस्थितीत शासनाने लागू करण्याची आवश्यकता या विषयावर  जनजागृती करण्यात येणार आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी असलेल्या शासकीय योजना, “महाज्योती” संस्थेच्या योजना, ईतर मागासवर्गीय वित्त महामंडळाच्या योजना , ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजना व जागतिक संस्थेच्या शिष्यवृत्ती योजनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.ओबीसी जनगणना-काळाची गरज यांवर प्रकाश टाकून शासनाकडे प्रलंबित ओबीसी समाजाच्या अन्य विकासात्मक मागण्यांच्या पूर्ततेसाठी ओबीसी समाज एकीकरण या प्रमुख हेतूने यात्रेच्या माध्यमातून प्रामुख्याने कार्य करण्यात येणार आहे. सभेत ओबीसी युवा अधिकार मंच,ओबीसी अधिकार मंच,राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ,संघर्ष वाहिनी, संविधान मंच, स्टु़डटंस राईटस असो.सेल्परिसपेक्ट मुव्हमेंट,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ, ,आता लढूया एकीनेच सारख्या अन्य बहुजन ओबीसी संघटनांचा सहभाग होता.