ग्रामस्थांच्या सहमतीनेच किन्ही , कासा आणि कटंगटोला गावांचे पुनर्वसन करा : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले

0
14

नदीकाठी भागातील पूर परिस्तिथी हाताळण्यासाठी आढावा बैठक संपन्न

गोंदिया : जिल्ह्याच्या काठावर वसलेल्या गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असतात. गोंदिया जिल्ह्यातील संजय सरोवर, पुजारीटोला आणि कालीसराड धरणाचे दरवाजे उघडल्या नंतर गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्तिथी निर्माण होते. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो तर काही गावांचे रुपांतर बेटांमध्ये होते. याचा सर्वाधिक फटका गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठी वसलेल्या किन्ही, कासा आणि कटंगटोला गावांना होतो. यामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

शासन निर्णय प्रमाणे नदीकाठी वसलेल्या ब्लू लाईन गावांचे पुनर्वसन करण्यात येते. मात्र अद्याप पुनर्वसन बाबत काहीही प्रगती दिसून येत नाही. ब्लू लाईन गावांचे पुनर्वसन करत असतांना शासन फक्त मोबदला देते. पावसाळा एका महिन्यावर असतांना पुनर्वसन कार्य करणे शक्य नाही. त्यामुळे पुरामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करणे बाबत शाळा व शासकीय इमारतीत व्यवस्था करणे व कोणत्याही आपतकालीन परिस्तिथीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केल्या. दरम्यान बैठकीला जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे,  उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,  उपजिल्हाधिकारी चौधरी,  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटील व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी तसेच संजय टेंभरे जि. प. बांधकाम सभापती उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या सहमतीनेच पुनर्वसन कार्य करण्यात यावे : जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

शासन पुनर्वसन  तर करते मात्र नागरिक जागा सोडत नाही. यामुळे पुनर्वसन कार्य रखडते. गोंदिया जिल्ह्यातील किन्ही , कासा आणि कटंगटोला गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे असून पुनर्वसनसाठी तयार असलेल्या व नसलेल्या ग्रामस्थांची यादी तयार करण्यात यावी आणि मगच निर्णय घेण्यात यावा अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केल्या.