मनरेगा कामात भंडारा राज्यातून प्रथम

0
7

1392 कामावर 80 हजाराहून अधिक मजुरांची उपस्थिती

भंडारा, दि. 28 : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा रोजगार देणारी महत्त्वाची योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय. मनरेगा योजनेची भंडारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू असून आज मजूर उपस्थितीमध्ये राज्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यात मनरेगाच्या विविध कामावर तब्बल 80 हजार 532 मजूर काम करत आहेत.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत सर्व कामांचे नियोजन या आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच केले असून वार्षिक नियोजन आराखडा सर्व व्यापक बनवण्यावर भंडारा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.

 जिल्ह्यामध्ये मजुरीसाठी होणारे स्थलांतरण मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीने कमी झाले आहे. कठीण काळात नियमित रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर व्हावी, यासाठी मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त काम घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी यंत्रणांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील 546 ग्रामपंचायत पैकी 321 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा योजनेतून विविध कामे सुरू आहेत. त्यामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आज 80 हजार 532 मजूर उपस्थिती नोंदविण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून 1 हजार 392 काम सुरू आहेत. कार्यरत मजुरांची मस्टर पारदर्शक पद्धतीने ठेवण्यात येत असून मनरेगा अंतर्गत मत्ता निर्मिती करण्यात येत आहे. कार्यरत मजुरांना आठ दिवसात मजुरी मिळत आहे.

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारचे कामे हाती घेतल्या जातात. यामध्ये भूमिहीन, शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी, शेततळे, फळबाग बंदिस्ती, पांदण रस्ते, वृक्ष लागवड अशी विविध कामे केली जात आहेत. नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांना भेट देवून पाहणी केली.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मनरेगाची काम सुरू आहेत. नोंदणीकृत मजुरांव्यतिरिक्त काम मिळविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी त्वरित जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा.

तालुका निहाय कामांची संख्या व मजुरांची संख्या पुढील प्रमाणे

भंडारा 238 कामावर 7 हजार 924 मजूर, लाखांदूर तालुक्यात 128 कामांवर 9 हजार 723, लाखनी तालुक्यात 152 कामांवर 11 हजार 617, मोहाडी तालुक्यात 288 कामांवर 19 हजार 121, पवनी तालुक्यात 53 कामांवर 5 हजार 50, साकोली तालुक्यात 226 कामांवर 21 हजार 682, तुमसर तालुक्यात 307 कामांवर 5 हजार 415 मजूर कार्यरत आहेत.