प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेत नाममात्र किमतीत मिळणार सौर कृषिपंप

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण
  • शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध
  • जिल्ह्यातील 94 शेतकऱ्यांनी केले अर्ज
  • नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

       गोंदिया, दि.28 :- राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.  त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप मिळणार आहेत. या योजनेत गोंदिया जिल्ह्यातील 94 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. इतर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      एमएनआरईने पीएम-कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असून 13 जानेवारी 2021 रोजी एक लाख सौर कृषिपंप व 30 ऑगस्ट 2022 रोजी पुढील एक लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.  राज्य शासनाकडून 12 मे 2021 रोजी राज्यात सदर योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख या प्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 5 लक्ष सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.

         अशी आहे पंपाची किंमत :- पंपाची क्षमता 3 एचपी पंपाची किंमत 1 लाख 93 हजार 803 रुपये, लाभार्थी हिस्सा सर्वसाधारण (10 टक्के) प्रवर्ग 19 हजार 380 रुपये, अनुसूचित जाती (5 टक्के) 9 हजार 690 व अनुसूचित जमाती (5 टक्के) 9 हजार 690, पंपाची क्षमता 5 एचपी पंपाची किंमत 2 लाख 69 हजार 764 रुपये, लाभार्थी हिस्सा सर्वसाधारण (10 टक्के) प्रवर्ग 29 हजार 975 रुपये, अनुसूचित जाती (5 टक्के) 13 हजार 488 व अनुसूचित जमाती (5 टक्के) 13 हजार 488, पंपाची क्षमता 7.5 एचपी पंपाची किंमत 3 लाख 74 हजार 440 रुपये, लाभार्थी हिस्सा सर्वसाधारण (10 टक्के) प्रवर्ग 37 हजार 440 रुपये, अनुसूचित जाती (5 टक्के) 18 हजार 720 व अनुसूचित जमाती (5 टक्के) 18 हजार 720 रुपये.

      अर्ज कसा करावा :- सौर कृषिपंप आस्थापनेचे उद्दिष्ट, पीएम-कुसुम योजनेच्या शासन निर्णयातील नमूद तरतूद, जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्ण करावयाचे आहे.  महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महाऊर्जा मार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु केल्यानंतर त्यास प्रचंड प्रतिसाद प्राप्त मिळाला असून एकाच वेळी असंख्य शेतकरी अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रक्रिया होण्यास विलंब होत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा. महाऊर्जाच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्यात यावा. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B  योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

       शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट, फसव्या संकेतस्थळाचा वापर करु नये. आनॅलाईन पोर्टल सुरू केल्यापासून राज्यात एकूण 23,584 अर्ज प्राप्त झाले असून गोंदिया जिल्ह्यातील 94 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. महाऊर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.  तसेच ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी 020-35000456 किंवा 020-35000457 या दूरध्वनी क्रमांकावर आपण तक्रार नोंदवू शकता. असे आवाहन महासंचालक (महाऊर्जा) रविंद्र जगताप यांनी केले आहे.