गोंदिया दि. ३० : वाढत्या लोकसंख्येनुसार तहसीलदार, तलाठी यांची पदसंख्या वाढवून महसूलची कामे निश्चित करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.उपविभाग गोंदिया येथील अपर तहसील शहर व तहसील ग्रामीण येथे समानस्तरावर कामे विभागणीच्या अनुषंगाने नवीन पद निर्मिती करण्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येनुसार तहसीलदार यांची पदसंख्या वाढविणे आणि विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गोंदियाचे लोकप्रतिनिधी गोपालदास अग्रवाल उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीत अपर तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांची प्रशासकीय जबाबदारी देण्यासंदर्भात, तसेच वितरणासंदर्भात तहसीलदार ग्रामीणला जबाबदारी देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात ग्रामीण व शहरी तहसीलदार यांच्याकडे क्षेत्राप्रमाणे जबाबदारी सोपविण्यात यावी, गोंदिया शहर येथील सिंधी कॉलनी स्थित विस्तापित सिंधी समाजाच्या अस्थायी पट्ट्यास विशेषबाब म्हणून स्थायी पट्टा करणेसंदर्भात प्रस्ताव सादर करावा, त्यावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.