विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध

0
14

गोंदिया,दि.28ः स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारला नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला.यावेळी नागपूर कराराची होळी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली.या प्रसंगी गोंदिया जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे, विदर्भवादी नेते वसंत गवळी, जिल्हा उपाध्यक्ष भोजराज ठाकरे, जिल्हा महासचिव सी.पी.बिसेन,सुनील भोंगाडे,अरुण बनाटे,दीपा काशीवार,पंचशीला पानतावणे,विकी ठाकरें आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

२८ सप्टेंबर १९५३ ला झालेल्या नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला बळजबरीने विदर्भाच्या जनतेची इच्छा नसताना महाराष्ट्रात सामील करून घेतले, नागपूर करारात दिलेल्या ११ कलमांपैकी बहुतांश कलमा पाळल्या गेल्या नाही म्हणून नागपूर करार हा संपुष्टात आला असून विदर्भातील जनतेचा बॅकलॉग वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून ४७ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. बेरोजगारांची फौज वाढली, नक्सलवाद वाढला, कुपोषण वाढले आहे यापासून मुक्ती करता स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ करावी अशी मागणी करत नागपूर कराराच्या प्रतीची होळी करण्यात आली. विदर्भ राज्य झाले पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.

या नंतर स्वातंत्र्याच्या लढाईचे प्रतीक असलेले आष्टी (शहीद) जिल्हा वर्धा येथून विदर्भ संकल्प पदयात्रा 30/09/2023 पासून काढून ती तळेगाव- आर्वी- कौंडण्यपुर अशी जाणार असून दिनांक 02/10/ 2023 ला दुपारी 12 वाजता विदर्भ संकल्प महिला मेळावा व रुक्मिणीला साकडे आंदोलन दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. विदर्भातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.