. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
गोंदिया, दि.31 : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ज्यांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविले नाही अशा पात्र तरुण- तरुणींनी जास्तीत जास्त प्रमाणात नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व नायब तहसिलदार अप्पासाहेब व्हनकडे यावेळी उपस्थित होते.
मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण आणि प्रमाणिकरण अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 63-अर्जुनी मोरगांव विधानसभा मतदार संघात 02 नविन मतदान केंद्र (230-तिडका व 253-अर्जुनी मोरगांव) तयार करण्याचे प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात आले असून भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे 18 ऑक्टोबर 2023 चे पत्रान्वये सदर नविन मतदान केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे पत्र दि.18.10.2023 अन्वये मंजुर मतदान केंद्रांची संपुर्ण यादी जिल्हाधिकारी कार्यालय येथील नोटीस बोर्ड, सर्व उपविभागीय कार्यालयातील नोटीस बोर्ड व सर्व तहसिल कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्ष यांना सदर यादी पुरविण्यात आलेली आहे.
विधानसभा मतदारसंघ 63-अर्जुनी मोरगांव, 64-तिरोडा, 65-गोंदिया, 66-आमगाव (ST). यामध्ये मतदान केंद्राची संख्या एकूण 1284 असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) संख्या सुध्दा 1284 आहे.
गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादी प्रमाणे मतदार संख्या पुढील प्रमाणे आहे. एकूण चार विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार- 5,45,902. स्त्री मतदार- 5,50,548. इतर- 09, असे एकूण मतदार- 10,96,459 आहेत.
जिल्ह्यातील सेनादलातील चार विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार- 1824, स्त्री मतदार- 104, एकूण मतदार- 1928 आहेत.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेद्वारे 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून पताळणी करण्यात आली असून एकूण चार विधानसभा मतदारसंघात मृत मतदार- 26,254, स्थलांतरीत- 20,463, दुबार- 1,299, असे एकूण 48,016 मतदार वगळण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भारत निवडणूक आयोगाचे 4 जुलै 2022 च्या पत्रानुसार गोंदिया जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार यादीतील मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्याबाबतची मोहिम सुरु असून आतापर्यंत चारही विधानसभा मतदारसंघात 6,85,980 मतदारांनी आपला आधार क्रमांक जोडणी केलेली असून 4,10,479 मतदार आधार क्रमांक जोडणीसाठी शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपले आधारकार्ड मतदार यादीशी लिंक करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. 26 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. यादीच्या अंतिम प्रसिद्धीसाठी 1 जानेवारी 2024 पर्यंत निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन डाटाबेस अद्ययावत करणे तसेच पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
शहरी भागात कमी प्रमाणात मतदार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. शहरी भागात मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून नागरिक मतदार नोंदणीसाठी वंचित राहू नये याकडे लक्ष दिले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.