88 गावातील नागरिकांना बसणार पुन्हा पुराचा तडाखा

0
18

 गोंदिया-पावसाळा उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. पावसाळय़ात अतवृष्टी झाली तर, जिल्ह्यातील ८८ गावांना पुराच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. पूरबाधित या गावांचे पुनर्वसन कसे करता येईल, याची उपाययोजना अद्याप विभागाने केली नाही. त्यामुळे हजारो कुटुंबे उघड्यावर येण्याची दाट शक्यता आहे. वातावरणात आमूलाग्र बदल घडून येत आहे. याचा अनुभव जिल्हावासींना आला आहे.
ऋतूमानाच्या बदलानुसार पावसाळय़ात कधी मुसळधार तर, कधी अतवृष्टी होते. याचा फटका सर्वसामान्यांना चांगलाच बसतो. त्यात नदीकाठावर वसलेल्या रहिवाशांचे काय हाल होत असतील, याची कल्पना न केलेलीच बरी.
बाघ, पुजारीटोला, कालीसरार, इटियाडोह हे मोठे प्रकल्प तर, खैरबंदा, संग्रामपूर, बोदलकसा, चोरखमारा, रेंगेपार, चुलबंद, उमरझरी, मानागढ, कटंगी, कलपाथरी आदी मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील २४ गावे वैनगंगा नदीकाठावर बसले आहेत. तसेच गोंदिया तालुक्यातील पाच, आमगाव तालुक्यातील १६, सालेकसा तालुक्यातील १२ गावे, देवरी तालुक्यातील ११ गावे बाघनदी काठावर वसली आहेत. आंभोरा, बरबसपुरा, फुलचूर ही गोंदिया तालुक्यातील तीन गावे पांगोली नदीकाठावर आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ गावे चुलबंद नदीकाठावर आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १३ गावे गाढवी नदीकाठावर वसली आहेत. मुसळधार आणि अतवृष्टीत या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. अनेकांची घरे जमीनदोस्त होतात. काही घरांच्या पायथ्याशी नदीचे पाणी येते.

पुरामुळे गाव ७५ टक्के बाधित होत असेल तर, त्याच गावांचे पुनर्वसन केले जाईल, असा नियम सांगत असल्याचे अधिकारी सांगतात. पूर येतो आणि नंतर ओसरतो. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच नाही. असे ही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दरम्यान आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे.त्यामुळे पावसाळय़ात आपली काय स्थिती होईल, याचीच चिंता बाधितांना लागली आहे.
तसेच किन्ही, कासा व मरारटोला या तीन गावांना पुराचा अधिक फटका बसतो. अनेक कुटुंबे उघड्यावर येतात. त्यामुळे या गावांचे पुनवर्सन करण्याचा प्रस्ताव २0१२ ला पुनर्वसन विभागाने शासनाकडे सादर केला. परंतु, चार वर्षाचा दीर्घ कालावधी लोटला तरी, अद्याप या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे याही वर्षी तेथील रहिवासांना पुराचा मार खावाच लागणार आहे, हे निश्‍चित.