महिला बालकल्याण सभापतीच्या पतीवर परशुरामकरांचे आरोप

0
9

 गोंदिया,दि.11-जि.प.च्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती विमल नागपुरे यांचे पती त्यांच्या दालनात बसून कारभारात लुडबूड करीत असल्याचा आरोप करीत शुक्रवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी एकच खळबळ उडवून दिल्याने पदाधिकारीसह अधिकारीही चांगलेच थबकले. एवढेच नाही तर अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी स्वत: पुढाकार घेत सुपरवायझर्सना त्यांचा ‘वाटा’ देण्यासाठीही बोलणी केल्याचा आरोप सदस्यांनी केला. या प्रकारावरून सभागृहात जि.प.सदस्य व सभापती यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. शेवटी अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी सभापतींना समज देऊन प्रकरण शांत केले.याच बैठकित परशुरामकर यांनी कृषी विभागाच्या खरेदीचाही मुद्दा उपस्थित केला.
शासन परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ८५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने सिंडीकेट बँकेत स्थानांतरित केल्याने बँकेला कृषी कर्ज वाटप करण्यात अडथळा निर्माण झाल्याची माहिती परशुरामकर यांनी सभागृहाला दिली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सडक अर्जुनी पंचायत समितीमधील घोटाळ्यावरून पुन्हा एकदा गाजली. १ कोटी रुपयापेक्षा जास्त घोटाळा झाला असताना यातील आरोपीला केवळ जि.प. सामान्य प्रशासन विभागाच्या चुकीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला, असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केला.बैठकिला जि.प.अध्यक्ष उषा मेढे,उपाध्यक्ष रचना गहाणे,शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे,महिलाबालकल्याण सभापती विमल नागपूरे,कृषी व पशुसंवधर्न सभापती छाया दसरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी,जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर,सुरेश हर्षे,उषा शहारे आदी उपस्थित होते.