उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा- जिल्हाधिकारी

0
15

उष्णतेच्या लाटेसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना

 गोंदिया, दि.15 : संभाव्य उष्णतेच्या लाटेसंदर्भात गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्यात आल्या. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आल्या आहेत. वातावरणीय बदल व तापमानात झालेली वाढ लक्षात घेता, पुढील दोन ते तीन महिने उष्णतेची लाट राहणार असा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

         याविषयी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी बैठक घेऊन,

         काय करावे : तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., घरी बनवलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमीत आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

          काय करू नये : लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेले व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नये. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावी व उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. दारू, चहा, कॉफी आणि काबोर्नेट थंड पेय घेऊ नये.